Rohit Sharma Statement on Test Captaincy: रोहित शर्माने ७ मे रोजी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यासह, रोहितने क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये त्याच्या भविष्याबद्दलच्या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे, ज्यासाठी बीसीसीआय नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. यादरम्यान रोहितच्या निवृत्तीवर त्याची एक मुलाखत समोर आली आहे, ज्यामध्ये त्याने कॅप्टन्सीबद्दल वक्तव्य केलं आहे.

गेल्या वर्षी म्हणडेच २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ३८ वर्षीय रोहित शर्मा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित शर्माने ७ मे रोजी संध्याकाळी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत आपण कसोटीतून निवृत्त होत असल्याचे सांगितले.

रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, ” मला सर्वांना हे सांगायचं आहे की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये देशाचं नेतृत्त्व करणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला इतकं वर्ष खूप प्रेम आणि कायम पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे खूप आभार. मी वनडे क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत राहणार आहे.”

रोहित शर्माने पत्रकार विमल कुमार यांना दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत भारताचे नेतृत्व करण्याबद्दलच्या शंकांबद्दल वक्तव्य केले होते. तेव्हा रोहित म्हणाला होता, “हो, मलाही तसंच वाटलं. कधीकधी काय होतं की सर्वांना एक युवा कर्णधार हवा असतो. जो १० वर्ष, १५ वर्ष नेतृत्त्व करेल त्यामुळे मला वाटलं आता मला कॅप्टन्सी मिळणार नाही. पण मी नेहमीच आभारी राहीन की मला ही संधी मिळाली.”

रोहित पुढे म्हणाला, “मलाही माहितीय की मी १० वर्ष संघाचं नेतृत्त्व नाही करू शकतं. पण जो काही वेळ मला मिळेल, त्याचा मला जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा होता. काही करून मला पूर्ण क्षमतेने नेतृत्त्व करायचं आहे.”

रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर, बीसीसीआय नवीन कसोटी कर्णधाराच्या शोधात आहे. यामध्ये शुबमन गिल या शर्यतीत आघाडीवर आहे. तर जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, केएल राहुलसारखे खेळाडू हे कर्णधारपदाचे दावेदार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी संघाबरोबर ऑस्ट्रेलियाला गेला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल सलामीला उतरले होते. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा खालच्या फळीत फलंदाजीला उतरला होता. त्यानंतर मेलबर्न कसोटीत रोहित पुन्हा सलामीवीराच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर त्याने सिडनी कसोटीसाठी स्वत:ला संघातून ड्रॉप करण्याचा निर्णय घेतला. भारताने बुमराहच्या नेतृत्त्वाखालील पहिली कसोटी जिंकली पण नंतर रोहितच्या नेतृत्त्वाखाली संघाने ४-१ ने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली होती. याशिवाय घरच्या मैदानावर न्यूझीलंडने भारतावर निर्भेळ विजय मिळवत मालिका ३-० ने जिंकली होती.