फॉर्मशी झगडत असलेला भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला झुरिच चॅलेंज बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या दोन पराभवांनंतर अखेर तिसऱ्या दिवशी बरोबरी करता आली. तिसऱ्या फेरीमध्ये इटलीच्या फॅबियाने करुआनाबरोबरचा डाव बरोबरीत सोडवण्यात आनंदला यश आले.
पहिल्या फेरीत आनंदला लेव्हॉन अरोनिअन आणि दुसऱ्या फेरीत ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना आनंदने पहिल्यापासूनच सावध पवित्रा घेतला होता. कारण पहिले दोन पराभव पुसून काढत आनंदला गुणांचे खाते उघडायचे होते. आनंद बचावात्मक खेळत असल्याने फॅबियाने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. काही वेळ शांतपणे खेळणाऱ्या फॅबियाने आपल्या दोन्ही उंटांसह आनंदवर चाल करण्याचा प्रयत्न केला खरा, पण आनंदने प्याद्याचा बळी देत डाव सावरला. आनंदने यावेळी प्यादा गमावला तरी त्याने फॅबियानच्या उंटांना चांगलेच जखडून ठेवले होते. पण यानंतर आनंदने सावधपणे खेळ करत डाव बरोबरीत सोडवण्यावरच धन्यता मानली.
आतापर्यंतच्या लढतींमध्ये नॉर्वेचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनने पाच गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. कार्लसनने हिकारू नाकामुराला यावेळी पराभूत केले. तर बोरिस गेलफंड आणि लेव्हॉन आरोनियन यांच्यातील सामना बरोबरीत सुटला.