माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यातील लढत जागतिक बुद्धिबळरसिकांसाठी पर्वणी ठरली. चेन्नईत घरच्या मैदानावर आनंदने ही लढत गमावली, मात्र या निमित्ताने आपल्या देशात बुद्धिबळाला अनुकुल वातावरण निर्माण झाले. त्यामुळेच आनंदच्या पराभवात बुद्धिबळ जिंकल्याची सकारात्मकता होती.
आनंद आणि कार्लसन यांच्यातील विश्वविजेतेपदाच्या लढतीचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर सर्व दिवस दाखविण्यात आले, हीच या खेळाच्या दृष्टीने उत्तुंग झेप होती. त्याचप्रमाणे अनेक वाहिन्यांवरही या लढतीची क्षणचित्रे दाखविली गेली. अनेक वेबसाइट्सवर, यु-टय़ूबवरही या लढतीचे ताजे वृत्त आणि चाली उपलब्ध होत्या. या सर्वच गोष्टींचा चाहत्यांनी मनमुरादपणे आनंद लुटला. ही लढत चेन्नईत सुरू असताना तिथेही विविध वयोगटांच्या १५ ते २० स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. तेथील अनेक उद्यानांमध्ये खुल्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी जसे वातावरण निर्माण केले जाते, तसेच काहीसे वातावरण आनंद-कार्लसन लढतीच्या वेळी निर्माण झाले होते. खऱ्या अर्थाने हा खेळ घराघरात पोहोचण्यासाठी ही लढत उपयुक्त ठरली. आनंदने ही लढत गमावल्यामुळे या खेळाच्या चाहत्यांच्या पदरी घोर निराशा पडली, पण त्यांना खात्री आहे की आनंद पुन्हा जागतिक स्तरावर उत्तुंग झेप घेईल.
कार्लसनने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आणि त्यानंतर आनंदसारख्या बलाढय़ खेळाडूवर मात करीत प्रथमच विश्वविजेता होण्याची किमया साधली. अव्वल स्थानासोबतच विश्वविजेतेपद मिळविण्याचा अनोखा पराक्रम कार्लसनने केला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षांवर त्याने आपला खऱ्या अर्थाने ठसा उमटवला. आव्हानवीर ठरविण्यासाठी झालेल्या स्पर्धेत त्याने बाजी मारली. गृहपाठापेक्षा ऐनवेळी डावात होणाऱ्या बदलानुसार रणनीती बदलून प्रतिस्पर्धी खेळाडूवर दडपण आणण्याची शैली त्याने दाखवून दिली. अनातोली कापरेव्ह, गॅरी कास्पारोव्ह व आनंद यांच्यासारख्या श्रेष्ठ विश्वविजेत्या खेळाडूंच्या मालिकेत आपण स्थान घेऊ शकतो, हेही त्याने दाखवून दिले आहे. अनेक वर्षे जागतिक स्तरावर अव्वल स्थान टिकविण्याची क्षमता आपल्याकडे आहे, याचा प्रत्ययच त्याने घडवला आहे.
विश्वविजेतेपदाच्या लढतीपूर्वी आजपर्यंत अनेक वेळा आनंदने केवळ जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये पूर्ण ताकदीनिशी न खेळता तसेच आपल्या खजिन्यातील महत्त्वाचे डावपेच न वापरता खेळण्यावर भर दिला आहे. याउलट कार्लसनने विश्वविजेतेपदाच्या लढतीसाठी पूर्वतयारी करताना अलेखाइन, ताल स्मृती, नॉर्वे चषक आदी अनेक अव्वल स्पर्धामध्ये पूर्ण तयारीनिशी भाग घेतला. त्याने ताल चषक व नॉर्वे चषक या दोन्ही स्पर्धामध्ये उपविजेतेपदही मिळविले. ताल स्पर्धेत आनंदला नववे स्थान मिळाले. तेथे बोरिस गेल्फंडने अजिंक्यपद मिळविले. नॉर्वे स्पर्धेत आनंदला पाचवे स्थान मिळाले. सर्जी कर्जाकिनने अजिंक्यपद मिळविले. अलेखाइन स्पर्धेत लिव्हॉन आरोनियनने विजेतेपद मिळविले तर गेल्फंड व आनंद यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान प्राप्त केले.
विश्वचषक लढत गमावल्यानंतर आनंदने लंडन क्लासिक स्पर्धेत भाग घेतला. प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत कार्लसन सहभागी झाला नव्हता. आनंदने मात्र या स्पर्धेद्वारे पुन्हा एकदा आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला. तेथे त्याने बाद फेरीत स्थान मिळविले. परंतु बाद फेरीत त्याला व्लादिमीर क्रामनिकविरुद्ध अपेक्षेइतके कौशल्य दाखविता आले नाही. या स्पर्धेत अमेरिकन खेळाडू हिकारू नाकामुराने अन्य बलाढय़ खेळाडूंना मागे टाकीत अजिंक्यपद पटकावले.
हम्पी व गोम्सची यशस्वी महिला आघाडी
महिलांमध्येही भारतीय खेळाडू चमकत आहेत. कोनेरू हम्पीने जागतिक चॅलेंजर स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. विश्वविजेतेपदासाठी आव्हान देणारा खेळाडू ठरविण्यासाठी झालेल्या लढतीत तिला चीनची होऊ यिफानकडून पराभवाला सामोरे जावे लागले. यिफानने त्यानंतर विश्वविजेत्या अॅना उशेनिना हिच्यावर मात करीत विश्वविजेतेपदावर झेप घेतली व चीनचे खेळाडू या खेळातही वर्चस्व गाजविणार असल्याची झलक दाखवून दिली आहे. हम्पी ही महिलांमधील सर्वोत्तम भारतीय खेळाडू आहे. तिच्याकडून प्रेरणा घेत अनेक उदयोन्मुख मुली आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवीत आहेत. मेरी अॅन गोम्सने महिलांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत लागोपाठ तिसऱ्यांदा अजिंक्यपद मिळवत अनोखी हॅट्ट्रिक साध्य केली. हम्पीची वारसदार होण्याची क्षमता तिच्याकडे आहे.
आनंदचा वारसदार.. अरविंद चिदम्बरम
आनंदने विश्वविजेतेपदाची लढत गमावल्यानंतर भारतीय बुद्धिबळ क्षेत्रावर अनिष्ट परिणाम होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्याचा वारसदार होण्याची क्षमता आपल्याकडे आहे हे चेन्नईतील १४ वर्षीय खेळाडू अरविंद चिदम्बरमने दाखवून दिले आहे. आनंद व कार्लसन यांच्यातील लढत सुरू असताना चेन्नईत खुल्या गटाची आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अरविंदने या स्पर्धेत चार ग्रँडमास्टर खेळाडूंसह अनेक अनुभवी खेळाडूंवर मात करीत अजिंक्यपद मिळविले. त्याच्या या कामगिरीने बुद्धिबळातील भारताचे आव्हान संपलेले नाही, याचाच प्रत्यय घडविला आहे.
नवीन वर्षांत कार्लसनचा आव्हानवीर ठरविण्यासाठी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी आनंद सहभागी होईल. आनंदचा सूर सध्या हरविला असला तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे तो पुन्हा उत्तुंग भरारी घेईल अशी अपेक्षा
आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2013 रोजी प्रकाशित
आनंद हरला; बुध्दिबळ जिंकले!
माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यातील लढत जागतिक बुद्धिबळरसिकांसाठी पर्वणी ठरली. चेन्नईत घरच्या मैदानावर आनंदने

First published on: 27-12-2013 at 04:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viswanathan anand loses chess wins