भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील वाँडर्सची खेळपट्टी खराब असल्याचे आयसीसीने म्हटले आहे. मात्र या मैदानावर बंदी घातलेली नाही.

जोहान्सबर्गमधील या खेळपट्टीवर अनपेक्षित उसळी पाहायला मिळाली. त्यामुळे चेंडू लागून काही फलंदाज जखमी झाले. आयसीसीच्या खेळपट्टी आणि मैदान निरीक्षण प्रक्रियेनंतर एलिट पॅनेलचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी खेळपट्टी खेळण्यास अयोग्य असल्याचा शेरा मारला.

‘‘तिसऱ्या कसोटीसाठीची वाँडर्सच्या खेळपट्टीवर काही चेंडू अपेक्षेपेक्षा अधिक उसळले. त्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडू जखमी झाले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करावे लागले. खेळाडूंच्या तक्रारीनंतर आयसीसीने खेळपट्टीची गंभीर दखल घेत पाहणी केली,’’असे पायक्रॉफ्ट यांनी दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाला पाठवलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. याबाबत बाजू मांडण्यासाठी मंडळाला दोन आठवडय़ाचा कालावधी देण्यात आला आहे.

कसोटी दर्जा मिळाल्यानंतर आजवर आयसीसीच्या सामनाधिकाऱ्यांनी वाँडर्स स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले नव्हते. मात्र आयसीसीने ताशेरे ओढल्यानंतर या कसोटी ठिकाणाला तीन दोष गुण मिळाले आहेत. हे गुण पुढील पाच वर्षे कायम राहतील. पुढील पाच वर्षांत दोष गुण पाचवर पोहोचल्यास वाँडर्स स्टेडियमवर १२ महिन्यांची बंदी घातली जाईल. त्या कालावधीत तिथे कुठलेही आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार नाहीत.

त्रयस्थ क्युरेटर्सची मागणी 

वाँडर्सच्या खेळपट्टीवरील वाढती टीका पाहता आयसीसीने त्रयस्थ क्युरेटर्सची (खेळपट्टी बनवणारे) नेमणूक करावी, असे भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी म्हटले आहे. ‘‘दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टय़ा खेळण्यायोग्य नाहीत, असे दिसून आले आहे. आयसीसीने याची गंभीर दखल घेत त्रयस्थ क्युरेटर्स निवडण्याची गरज आहे. हे क्युरेटर्स जगभरातील खेळपट्टय़ांच्या तयारीवर लक्ष ठेवतील. आयसीसीने त्रयस्थ पंच नेमले आहेत. त्यामुळे त्रयस्थ क्युरेटर्स नेमण्याची वेळ आली आहे,’’ असे ते म्हणाले.