भारताचे माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांनी अलीकडेच उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या वादानंतर वासिम जाफर यांनी हे पाऊल उचलले. उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वासिम जाफर यांच्यावर धर्मावर आधारीत संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. वासिम जाफर यांनी बुधवारी हा आरोप फेटाळून लावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माहिम वर्मा यांनी मीडियामधून, माझ्यावर मी मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मला प्रचंड दु:ख झाले आहे, असे वासिम जाफर यांनी सांगितले. ४२ वर्षीय वासिम जाफर भारतासाठी ३१ कसोटी सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये वासिम जाफर हे एक मोठे नाव आहे. माहिम वर्मा हे उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचिव आहेत.

वासिम जाफर यांनी मंगळवारी उत्तराखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. हस्तक्षेप आणि पक्षपाती निवडसमिती ही कारणे त्यांनी राजीनामा देताना दिली. “संघ निवडीत जातीयवादाचा अँगल आणणे, खूप दु:खद आहे” असे वासिम जाफर पत्रकार परिषदेत म्हणाले.

“संघ निवडीमध्ये मी इक्बाल अब्दुल्लाला प्राधान्य देतोय. इक्बालला मला संघाचे कर्णधार बनवायचे होते, हे माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार, चुकीचे आहेत” असे जाफर म्हणाले. “मला जय बिस्ताला कर्णधार बनवायचे होते. पण रिझवान शमसाद आणि निवड समितीच्या अन्य सदस्यांनी इक्बालला कर्णधार बनवण्याचा पर्याय सुचवला. तो संघातील वरिष्ठ खेळाडू आहे. त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे मी त्यांच्या सल्ल्याशी सहमत झालो” असे वासिम जाफर यांनी सांगितले.

रणजी करंडक स्पर्धेत आपल्या फलंदाजीने दबदबा निर्माण करणाऱ्या वासिम जाफर यांनी संघाच्या प्रशिक्षणा दरम्यान मौलवींना आणल्याचा आरोपही फेटाळून लावला. “डेहराडूनला शिबिर असताना दोन ते तीन शुक्रवार मौलवी आले होते. पण मी त्यांना बोलावले नव्हते. शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी इक्बाल अब्दुल्लाने माझी आणि संघाच्या व्यवस्थापकांची परवानगी घेतली होती” असे जाफर म्हणाले. संघाच्या प्रशिक्षणानंतर प्रार्थना करण्यात आली. त्यामुळे याला मुद्दा का बनवला जातोय, ते समजत नाहीय असे जाफर म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim jaffer rejects allegation of favoured muslim players in uttarakhand selection dmp
First published on: 11-02-2021 at 09:54 IST