पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामना आयोजनावरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अनेक चाहत्यांनी या सामन्यावर बहिष्कार घातला आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय सचिवांनी या सामन्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
‘केंद्र सरकारने भारत-पाकिस्तान सामन्यांसंदर्भात जारी केलेल्या धोरणानुसार सामना आयोजनाचा निर्णय झाला आहे. आशिया चषक ही दोन देशांदरम्यानची स्पर्धा नाही. यामध्ये अनेक संघ सहभागी होतात. भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातला तर देशाचं कॉमनवेल्थ तसंच ऑलिम्पिक आयोजनाचं स्वप्न धोक्यात येऊ शकतं’, असं बीसीसीआयचे सचिव देवजीत साईकिया यांनी सांगितलं. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागची भूमिका मांडली.
यंदा एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांनी प्राण गमावले होते. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवत पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्धव्स्त केले होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी व्यापार थांबवला. पाकिस्तानला मिळणारं पाणीही थांबवलं होतं. या पार्श्वभूमीवर आशिया चषकातला हा सामना होणार नाही अशी चिन्हं होती मात्र केंद्र सरकारने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. आयसीसी तसंच आशिया चषकसारख्या स्पर्धेत भारत पाकिस्तानविरुद्ध खेळेल मात्र दोन देशांदरम्यान क्रिकेट मालिका होणार नाही असं केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं.
आशिया चषकाचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर चाहत्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आंतरराष्ट्रीय बहिष्कारासारखा पर्याय धोक्याचा ठरू शकतो. ऑलिम्पिक तसंच कॉमनवेल्थ आयोजनासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. बहुराष्ट्र स्पर्धेत भारताने अशी भूमिका घेणं अडचणीचं ठरू शकतं असं साईकिया यांनी सांगितलं.
साईकिया म्हणाले, ‘आम्ही आशिया चषकात सहभागी होण्याचा निर्णय घेतला कारण या स्पर्धेत अनेक संघ खेळत आहेत. ऑलिम्पिक, फिफा वर्ल्डकप, एएफसी, आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा यासारखीच ही स्पर्धा आहे. आपण या स्पर्धेवर किंवा सामन्यावर बहिष्कार टाकू शकत नाही. तसं केल्यास त्याचे परिणाम नकारात्मक होतात. जेव्हा भविष्यात आपल्याला एखादी जागतिक स्तरावरच्या स्पर्धेचं आयोजन करायचं असेल तेव्हा अशी भूमिका अडचणीत टाकू शकते. या स्पर्धेत आपण सहभागी होत आहोत कारण खेळणं, न खेळणं थेट आपल्या हातात नाही. दोन देशांदरम्यानची मालिका असती तर त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट आहे. २०१२-१३ नंतर पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळलेलो नाही’.
द्विराष्ट्रीय मालिकेसंदर्भात सहजतेने निर्णय घेता येतो पण बहुराष्ट्र संघांच्या स्पर्धेत असा निर्णय घेणं जोखमीचं आहे. आशिया चषकात भारत-पाकिस्तान संघ तीनवेळा आमनेसामने येऊ शकतात. रविवारी प्राथमिक फेरीचा सामना आहे. यानंतर सुपर फोर गटाचे सामने आहेत. त्यानंतर अंतिम लढत होणार आहे.
‘पाकिस्तान आपल्याशी मैत्रीपूर्ण वागत नाही आणि भारताविरुद्ध त्यांच्या कारवाया सुरूच आहेत. म्हणूनच आपण त्यांच्याविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला. पण गेल्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी टी२० वर्ल्डकप झाला. आयसीसीतर्फे आयोजित स्पर्धा होती. वनडे वर्ल्डकप किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धा आयसीसीतर्फे होतात. त्यांचं मोठं नियोजन असतं. एखाद्या संघाने बहिष्काराचा निर्णय घेतल्यामुळे स्पर्धेचं कोष्टक कोलमडू शकतं. अर्थकारणावरही परिणाम होतो. स्पर्धा आयसीसीची असते, आपला निर्णय नसतो’, असं साईकिया यांनी स्पष्ट केलं.
‘आपण बहिष्काराची भूमिका घेतली तर इंडियन स्पोर्ट्स फेडरेशनवर कारवाई होऊ शकते. समजा भारताने एएफसी फुटबॉल स्पर्धेतून माघार घेतली तर भारतीय फुटबॉल संघटनेवर कारवाई होईल तसंच हे आहे. भारतीय टेनिस संघाने डेव्हिस चषक स्पर्धेत खेळण्यास नकार दिला तर त्यांच्यावर कारवाई होईल. ऑलिम्पिक किंवा कॉमनवेल्थ आयोजनावेळी हे त्रासदायक ठरू शकतं. समजा भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला तर भारतीय अॅथलेटिक्स महासंघावर बंदीची कारवाई होऊ शकते, असं साईकिया यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, ‘खेळाडूंच्या कारकिर्दीला धोका निर्माण होईल असा निर्णय बीसीसीआय घेऊ शकत नाही त्यामुळेच आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामना होत आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीचं आम्ही पालन करत आहोत. खेळ आणि खेळाडू यांच्या हितासाठीच हा निर्णय घेतला आहे’.