निकिता काळेची ‘वजनदार’ कामगिरी

अ‍ॅथलेटिक्समध्ये कविता राऊत, मोनिका आथरे, संजीवनी जाधवसह इतर अनेक, बुद्धिबळमध्ये विदित गुजराथी यांच्यानंतर आता वेटलिफ्टिंगमध्येही नाशिकने आंतरराष्ट्रीय पातळीवर वजनदार कामगिरी केली असून मनमाडच्या निकिता काळेकडे त्याचे श्रेय जाते. ऑस्ट्रेलियात आयोजित युवा राष्ट्रकुल स्पर्धेत

ugc new decision direct admission to phd after graduation
आता पदवीनंतर पीएच.डी.ला मिळणार थेट प्रवेश! काय आहे युजीसीचा नवा निर्णय? युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांची माहिती 
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
President Draupadi Murmu Standing While Giving Bharatratna Award To Lalkrishna Advani
लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार मिळताना मोदींकडून नियमभंग? लोक म्हणतात, “शिस्त- शिक्षणाचा..”

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात ७३ किलोपर्यंत स्नॅच आणि ९० किलोपर्यंत क्लीन जर्क असे एकूण १६३ किलो वजन उचलून निकिताने सुवर्णपदकाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण मिळविणारी निकिता ही नाशिक जिल्ह्य़ातील पहिलीच खेळाडू ठरली आहे. नाशिकच्या छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेची निकिता ही विद्यार्थिनी असून छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे. याआधी बँकॉक येथे एप्रिलमध्ये झालेल्या जागतिक युवा स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड झाली होती.

आई-वडील शिक्षक, एक बहीण, भाऊ अभियांत्रिकीचा विद्यार्थी. अशा सुशिक्षित, परंतु क्रीडाक्षेत्राची कोणतीही पाश्र्वभूमी नसलेल्या घरातील निकिता वाल्मीक काळे आज नाशिकची ओळख झाली आहे. मनमाडपासून १५ किलोमीटरवरील चोंढी (जळगाव) हे काळे परिवाराचे मूळ गाव. नोकरीनिमित्त ते मनमाडला स्थायिक झाले. सध्या छत्रे न्यू इंग्लिश विद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या निकिताने इयत्ता आठवीपासून वेटलिफ्टिंगचा सराव करण्यास सुरुवात केली. वेटलिफ्टिंगसारख्या खेळाच्या सरावासाठी मुलीला पाठवणे आणि तिच्यामागे खंबीरपणे उभे राहणे, ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट म्हणावी लागेल. निकिताने दररोज सकाळचे आणि सायंकाळचे दोन तास तिने केवळ वेटलिफ्टिंगच्या नावे केले. या कष्टाचे फळ लवकरच तिला मिळाले. प्रथम जिल्हा आणि नंतर राज्य स्तरावर तिच्या नावापुढे पदक लागण्यास सुरुवात झाली. सलग तीन वर्षांपासून राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने सुवर्ण मिळविले आहे. राष्ट्रीय स्तरावर अभिमान वाटावा अशी कामगिरी करूनही तिच्या नावाचा फारसा गवगवा झाला नाही.

डिसेंबर २०१६ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या युवा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत निकिताने सुवर्ण आणि कांस्य अशी कमाई केली. या कामगिरीची दखल घेऊन पतियाळा येथे आयोजित संभाव्य भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी तिची निवड झाली. भारताची ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगपटू कुंजुराणी देवी यांच्या मार्गदर्शनाखाली निकिताने त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले. पाच राज्यस्तरीय शालेय स्पर्धामध्ये पाच सुवर्ण, युवा अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्ण अशी सुवर्णमयी झळाळी लाभलेली तिची कारकीर्द आहे. खेळाप्रमाणेच अभ्यासातही तिची कामगिरी वजनदार आहे. दहावीच्या परीक्षेत मिळालेले ८७ टक्के गुण त्याची साक्ष देतात. निकिताची खेळातील प्रगती पाहून आई-वडीलही आनंदी असून तिने या खेळात शिखर गाठावे अशीच त्यांची इच्छा आहे.

निकिताच्या आजपर्यंतच्या यशामागे तिचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. सध्या त्यांच्याकडे २५ मुली आणि १५ मुले सराव करीत आहेत. ६३ नंतर ६९ किलो वजनी गटात सहभाग घेणारी निकिता ६८ किलो ‘स्नॅच’ आणि ८७ किलो ‘क्लिन अ‍ॅण्ड जर्क’पर्यंत वजन पेलू लागली. पतियाळा येथे सरावादरम्यान तिच्या कामगिरीत दिवसेंदिवस सुधारणा होत गेली. त्यात ७५ किलो स्नॅच आणि ८८ किलो क्लिन अ‍ॅण्ड जर्क अशी तिने मजल मारली. ऑस्ट्रेलियातील स्पर्धेत तिने आपल्या कामगिरीत अधिकच सुधारणा करीत थेट सुवर्ण मिळविले.

आपल्या एकातरी खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदक मिळवावे, ही प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची इच्छा निकिताच्या कामगिरीमुळे पूर्ण झाली आहे. त्यामुळे आनंदित असलेले प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची निकिताने ऑलिम्पिकपर्यंत मजल मारावी अशी इच्छा असून निकितानेही आता २०२० आणि २०२४चे ऑलिम्पिक हे आपले पुढील लक्ष्य राहील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.