West Indies Cricket Board Emergency Meeting : वेस्ट इंडिज क्रिकेट संघ सध्या बिकट परिस्थितीचा सामना करत आहे. वेस्ट इंडिज संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ३-० अशा फरकाने गमावली आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात वेस्ट इंडिंजचा संघ अवघ्या २७ धावांत गारद झाला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसरी सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. यासह वेस्ट इंडिजने या सामन्यात १७६ धावांनी पराभव पत्करला. या दारुण पराभवानंतर वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली असून वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात तातडीने आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

विजयासाठी २०४ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजने १४.३ षटकातच शरणागती पत्करली आणि ऑस्ट्रेलियाने १७६ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असं निर्भेळ यश मिळवलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २२५ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडिजचा डाव १४३ धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात १२१ धावा करता आल्या. अल्झारी जोसेफने ५ तर शामर जोसेफने ४ विकेट्स घेत कांगारुंचं कंबरडं मोडलं. चौथ्या डावात वेस्ट इंडिजने जराही प्रतिकार न करता शरणागती पत्करली. वेस्ट इंडिजचे सात फलंदाज खातं देखील उघडू शकले नाहीत.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने बोलावली दिग्गजांची बैठक

या पराभवानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डॉ. किशोर शॅलो यांनी तातडीची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. त्यांनी काही दिग्गज कॅरेबियन खेळाडूंना पत्र पाठवून बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. ब्रायन लारा, व्हिव्हियन रिचर्ड्स आणि सर क्लाइव्ह लॉयड यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. या बैठकीत तिन्ही दिग्गजांच्या सूचना व सल्ल्यांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. शॅलो यांनी म्हटलं आहे की “ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत अपयशानंतर मी तातडीची आपत्कालीन आढावा बैठक बोलावण्याचे आदेश दिले आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. किशोर शॅलो काय म्हणाले?

किशोर शॅलो म्हणाले, “चर्चेतून मार्ग निघावा, महत्त्वाच्या सूचना प्राप्त व्हाव्यात यासाठी मी आपल्या संघाच्या तीन माजी खेळाडूंना बोलावलं आहे. तसेच शिवनारायण चंद्रपॉल, डेसमंड हॅस व इयान ब्रॉडशॉ हे वेस्ट इंडिज क्रिकेट समितीतील सदस्य देखील या बैठकीला उपस्थित असतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर खेळाडूंना व सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना झोप लागली नसेल. ते परिश्रम करून पुनरागमन करतील. तसेच मला वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या चाहत्यांना विनंती करायची आहे की तुम्ही आपल्या खेळाडूंबरोबर उभे राहा.”