अमित ओक – response.lokprabha@expressindia.com
एकेकाळी विंडीजच्या संघाचा इतका दरारा होता की त्याची बाकीच्या संघांना दहशत वाटायची. एकेकाळी ज्या संघाला सलाम ठोकला जायचा, त्याला आज कुणीही येतं आणि टपली मारून जातं.
हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ १९४५-१९६५ असा मानतात. १९०५-१९५५ हा मराठी नाटय़संगीतातील गंधर्वयुगाचा सुवर्णकाळ. ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीसाठी १९२८-१९६४ हा सुवर्णकाळ होता. आयटी क्षेत्राचाही काही वर्षांपूर्वी सुवर्णकाळ होता. असे अजून बरेच सुवर्णकाळ सांगता येतील. मग तो ‘वाघांचा’ सुवर्णकाळ असो नाही तर जुन्या अँटिक ‘घडय़ाळांचा’. वेस्ट इंडीज म्हणजे क्रिकेटमधील एके काळचे गंधर्वच. या क्रिकेट गंधर्वाचा सुवर्णकाळ दोन टप्प्यांतला. १९४७-४८ पासून १९६६-६७ असा पहिला टप्पा, तर १९७४-७५ ते १९९५-९६ असा दुसरा टप्पा.
जॉर्ज हेडली, थ्री डब्लूज, कन्हाई, ग्रीनीज-हेन्स, सोबर्स, लॉईड, रिचर्ड्स, लारा असे असामान्य फलंदाज, तर हॉल, रॉबर्ट्स, ग्रिफिथ, गिब्स, गार्नर, होिल्डग, मार्शल, वॉल्श-अँब्रोस असे एकाहून एक खतरनाक गोलंदाज. यांच्याबरोबर जिंकणे सोडाच नुसते खेळायला मिळाले तरी समोरचे संघ धन्यता मानत. सध्याच्या या िवडीज संघाकडे पाहिलं तर ‘क्या से क्या हो गया’ या ‘गाईड’ चित्रपटातील सचिनदादा बर्मन यांच्या सुपरहिट गाण्याची आठवण येते. याच वर्षांच्या सुरुवातीस इंग्लंडला घरच्या मदानावर कसोटी मालिकेत पराभूत केल्याचे सोडल्यास मागील सहा वर्षांत िवडीजने मोठय़ा संघाविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. २००३ पासून आत्तापर्यंत िवडीज संघ जवळपास ५३-५४ कसोटी मालिका खेळला आहे. त्यापकी जेमतेम ११ मालिका विजय, त्यातही सात विजय झिम्बाब्वे आणि बांगलादेशविरुद्ध कसेबसे मिळवले आहेत. अलीकडेच बांगलादेशनेही िवडीजला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत चक्क २-० असा व्हाइट वॉश देऊन िवडीजच्या खेळाडूंचे चेहरे पांढरे केले होते. यावरून िवडीजची खालावलेली कामगिरी लक्षात येते. अपुरे मानधन, विक्षिप्त बोर्ड अशी विविध मलमं या िवडीजच्या पराभवाच्या जखमेवर चोळली जातात. वेस्ट इंडीजचे क्रिकेटमधील बारसे १९२८ मध्ये झाल्यापासूनच ही समस्या त्यांना भेडसावते आहे; पण म्हणून त्यांची कामगिरी कधीच आजच्यासारखी रोगट नव्हती. उलटपक्षी नेहमीच प्रफुल्लित व ताजीतवानी वाटली. ‘मौजमजा’ ही व्याख्या िवडीज खेळाडूंसाठी बरीच मोठी होती. दारू, पाटर्य़ा, नाचगाणे आणि रात्रीची आन्हिकं उरकून ते सकाळी कसोटीसाठी तयार असत. रात्रीची िझग ते पबच्या पायरीपाशीच उतरवून येत.
सुवर्णकाळात २४ कॅरेटप्रमाणे लकाकणारे त्यांचे खेळाडू जे प्रतिस्पध्र्याला गुलामासारखे झोडपत ते आज सोन्याचा मुलामा दिलेलेसुद्धा वाटत नाहीत. त्यामुळे िवडीजसमोर खेळताना ‘भय इथले संपत नाही’ अशी भावना समोरच्या संघांची असायची, तेच संघ आता ‘कोण होतास तू काय झालास तू’ असं हिणवत आहेत. एके काळी ज्या संघाला सगळे संघ सॅल्यूट ठोकायचे त्याच संघाच्या बाबतीत कुणीही यावं आणि टपली मारून जावं अशी अवस्था झाली आहे.
केवळ प्रेक्षकच नव्हे तर प्रतिस्पर्धी संघ अगदी खडूस ऑस्ट्रेलियानेसुद्धा पूर्वी िवडीज संघातील खेळाडूंना प्रचंड आदर दिला आहे. १९६१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्याच टाय झालेल्या अजरामर ब्रिस्बेन कसोटीत सोबर्सने अफलातून शतक झळकावले होते. त्या खेळीदरम्यान मिडॉनवर ड्राइव्ह मारण्यासाठी सोबर्स पुढे सरसावला होता आणि त्याच्या लक्षात आले की हा चेंडू आत येणारा नसून बाहेर जाणारा आहे. रिची बेनॉने तो गुगली टाकला होता. दुसरा एखादा फलंदाज असता तर यष्टिचीत किंवा पायचीत झाला असता; पण सोबर्सने ऐन वेळी फटका बदलला आणि ‘वेल बोल्ड’ असे बेनॉला म्हणत खणखणीत स्ट्रेट ड्राइव्ह लगावत चौकार वसूल केला. बेनॉनेदेखील टाळ्या वाजवून सोबर्सचे जाहीर कौतुक केले. अंगावर रोमांच उभे करणारा हा प्रसंग पाहून तेव्हाचे प्रेक्षक थरारले होते. १९५० च्या दशकातले माजी कप्तान सर फ्रँक वॉरेल मदानावर फलंदाजीसाठी येताना ज्या प्रकारे छाती पुढे करून आत्मविश्वासाने येत तो रुबाब एखाद्या सिंहाप्रमाणे भासे. ते स्वभावानेदेखील सज्जन व खिलाडूवृत्ती जोपासणारे होते. आज ८१ वर्षांचे गॅरी सोबर्स खेळायला आले तरी सध्याच्या फलंदाजांपेक्षा उत्तम खेळतील. आज अॅम्ब्रोस, गार्नर, होिल्डग वयाची पन्नाशी-साठी उलटूनही अचूक टप्प्यावर मारा करतील. २००३ च्या विश्वचषकात तर ब्रायन लाराने हेपिटायटिस बीसारख्या गंभीर आजारातून उठून आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात अप्रतिम शतक ठोकले होते, तर कर्टली अम्ब्रोसने त्याच्या ‘टाइम टू टॉक’ या आत्मचरित्रात त्याच्या पर्थ कसोटीतील एक धाव देऊन सात बळी टिपण्याच्या अजरामर स्पेलचे वर्णन करताना म्हटले आहे की, ‘‘त्या वेळी मी अनप्लेयेबल होतो. त्या वेळी माझ्यासमोर फॉर्मात असलेले ब्रॅडमन, सोबर्स असोत वा रिचर्डस असो कोणीही टिकाव धरू शकले नसते.’’ इतका आत्मविश्वास या महान गोलंदाजाकडे होता. व्हिव रिचर्ड्स तर च्युइंगम चघळत गोलंदाजांची कॅडबरी करत असे. आजही या खेळाडूंची नुसती नावं घेतली तरी क्रिकेटच्या मदानावरील गवताची पाती थरारतात. सध्याच्या संघाला वेस्ट इंडीज म्हणण्यापेक्षा वर्स्ट इंडीज म्हणणे योग्य ठरेल. त्यांचा कप्तान जेसन होल्डर हा जत्रेत हरवल्यामुळे भेदरलेल्या माणसासारखा वाटतो, तर गोलंदाज हे ‘बाळ, तुला लागलं तर नाही ना’ असं फलंदाजांना म्हणत धावांची खिरापत वाटणारे सोज्वळ भाविक वाटतात. एके काळी घरंदाज वाटणारे फलंदाज धावांच्या बाबतीत बेघर झाल्याने पुनर्वसन प्रकल्पाच्या शोधात असलेले बापुडवाणे वाटतात. विश्वचषकाच्या लढाईत १९७५ व १९७९ साली बिनविरोध निवडून आलेल्या वेस्ट इंडीज संघाला आजकाल डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून पात्रता फेरीत खेळण्याची वेळ आली आहे. त्यातसुद्धा अंतिम सामन्यात नवखा उमेदवार असलेल्या अफगाणिस्तानने वेस्ट इंडीजचा पराभव करून ‘जायंट किलर’ अशी उपाधी मिळवली आहे. १९७५ साली कोणी कल्पनाही केली नसेल की, एके काळी क्रिकेटजगतावर एकहाती सत्ता स्थापन करणाऱ्या िवडीजची अवस्था निवडणूक चिन्ह गमावलेल्या पक्षाप्रमाणे होईल. १९७५ च्या विश्वचषकात सगळे सामने आरामात जिंकून अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने बलाढय़ ऑस्ट्रेलियाला पराभूत केले व पहिला विश्वकप स्वत:च्या कपाटात जमा केला होता. त्या वेळी अंतिम सामन्यात कर्णधार क्लाईव्ह लॉइडने तर कुऱ्हाडीच्या ताकदीने चेंडूवर घाव घालत घणाघाती शतक ठोकले होते. १९७९ साली अंतिम सामन्यात पुन्हा एकदा वेस्ट इंडीजने आपला रांगडा हिसका दाखवला. या वेळी अत्याचारग्रस्त संघ होता इंग्लंड. व्हिव्ह रिचर्ड्सने ब्रिटिशांवर आपला आसूड काढला आणि १३८ धावांचा बोजा इंग्लंडच्या सातबाऱ्यावर चढवला. नंतर आडदांड व उंचपुऱ्या जोएल गार्नरने यॉर्कररूपी क्षेपणास्त्र डागून इंग्लंडला भुईसपाट केले.
१९८३ साली पुन्हा एकदा वेस्ट इंडीज अंतिम फेरीत पोहोचला. या वेळी समोर भारताच्या रूपाने प्रथमच आशियायी संघ समोर होता. दोन संघांची त्या वेळी तुलना करायची झाल्यास वेस्ट इंडीज हा दोन विश्वचषक जिंकून क्रिकेटचा एक बडा जमीनदार होता, तर भारत हा अल्पभूधारक शेतकरी असल्याप्रमाणे अल्पसंतुष्ट होता. अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने भारताला १८३ धावांत गुंडाळून पुन्हा एकदा वर्ल्ड कपचा जहागीरदार होण्याचा मनसुबा प्रकट केला; पण भारतीयांनी कमाल केली व जहागीरदार होण्याचे स्वप्न बघणाऱ्या वेस्ट इंडीजला भूमिहीन केले. इतिहास रचला गेला. भारताने जगाला दाखवून दिले की, मक्तेदारी वगरे काही नसते. िवडीजच्या फाजील आत्मविश्वासासमोर शिस्तबद्ध खेळ करून भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले आणि तिथूनच वेस्ट इंडिजच्या गंधर्वयुगाच्या अस्ताला सुरुवात झाली. १९८७ ची विश्वचषक स्पर्धा प्रथमच आशियात खेळवली गेली. त्यात बाद फेरी गाठण्यात िवडीजला अपयश आले असले तरी पुढील दशकभर िवडीजने आपला दबदबा राखून ठेवला होता; पण पूर्वीची मर्दुमकी व एकहाती सत्ता गाजवण्याची कामगिरी त्यांच्याकडून घडत नव्हती. भारत, पाकिस्तानसारखे आशियायी संघ उदयास येत होते, तर तिकडे न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेची १९९२च्या विश्वचषकातील मुसंडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. राऊंड रॉबिन पद्धतीने सगळ्या संघांविरुद्ध आठ सामने खेळवल्यावर पहिले चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश मिळवणार होते. वेस्ट इंडीजने केवळ चार सामने जिंकले. त्यामुळे याही स्पध्रेत ते बाद फेरी गाठू शकले नाहीत. १९९६ साली पुन्हा एकदा आशियात रंगलेल्या विश्वचषक स्पध्रेत िवडीजने कंबर कसली. या वेळी ब्रायन लारा – रिचर्डसन आणि वॉल्श – अँब्रोस असा मोठा तोफखाना बाळगणाऱ्या िवडीजने उपांत्य फेरी गाठली. पुन्हा एकदा विश्वकपावर नाव कोरण्यासाठी िवडीजचे शिलेदार सज्ज झाले होते. उपांत्य सामन्यात गाठ बलाढय़ ऑस्ट्रेलियाशी होती. गोलंदाजांनी आपली कामगिरी फत्ते करत ऑस्ट्रेलियाला २०७ धावांवर रोखले होते. नंतर फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडीजने दोन बाद १६५ धावा झाल्यावर तर आता ही धावसंख्या पार करणे म्हणजे िवडीजसाठी केकवॉक होता; पण हाराकिरी म्हणजे काय याची व्याख्या द्यायची झाली तर वेस्ट इंडीजची शेवटच्या टप्प्यातील फलंदाजी उदाहरण म्हणून द्यावी लागेल. संपूर्ण संघ लवकर केक खाण्याच्या हावरेपणामुळे या केकवरूनच पाय घसरून पडला व पाच धावांनी सामना गमावला. विशेष म्हणजे दुसऱ्या उपांत्य सामन्यांतही भारताने लंकेविरुद्ध अशीच हाराकिरी करून हातात आलेला सामना गमावला होता. यानंतर मात्र वेस्ट इंडीजची अधोगती सुरू झाली व पुढील पाचही विश्वचषक स्पध्रेत ते केवळ पाहुणे कलाकार असल्याप्रमाणे खेळले. एके काळी हाच संघ फलंदाजीत सुपरस्टार्सचा भरणा, तर गोलंदाजीत खलनायकांचा ताफा घेऊन उतरायचा. त्याच िवडीजची अवस्था आता एक-दोन सीनमधील पाहुण्या कलाकाराचा रोल करायला येतात तसे हजेरी लावू लागले.
िवडीजचे पूर्वीचे गंधर्वयुग परत कधी बघायला मिळेल का; ज्यात धावांच्या अत्तराचा शिडकावा असेल, गायक अचूक समेवर येतात त्याप्रमाणे गोलंदाजांचे यॉर्कर समेवर येतील, ऑर्गनच्या सुरांच्या नांदीप्रमाणे हेन्स- ग्रिनीजच्या तोडीचे सलामीवीर सामन्याची नांदी गातील, बालगंधर्व जसे तानांचा पाऊस पाडत तसे सोबर्स-रिचर्ड्सच्या दर्जाचे फलंदाज धावांचा पाऊस पाडतील. बालगंधर्व – मा. कृष्णराव – केशवराव भोसले – अल्लादिया खान यांच्या जुगलबंदीप्रमाणे गार्नर – होिल्डग – मार्शल – अँब्रोस अशा प्रकारच्या दर्जेदार गोलंदाजांची बळी मिळवण्यासाठी जुगलबंदी रंगेल. हे स्वप्नवत असले तरी या विश्वचषकात गेल, रसेल, होप असे बॅटिंग गंधर्व त्यांची अदाकारी दाखवण्यासाठी इंग्लंडच्या रंगमंचावर सज्ज झाले आहेत.
सौजन्य – लोकप्रभा