२०१८ सालात पार पडणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाचं यजमानपद आयसीसीने वेस्ट इंडिजकडे सोपवलं आहे. ९ ते २४ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा रंगणार असल्याचं आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. यावेळी यजमान वेस्ट इंडिजचा संघ आपलं २०१६ सालचं विजेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करेल. २०१६ साली झालेल्या विश्वचषकात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाच्या महिला संघावर ८ गडी राखून मात केली होती.
यजमान वेस्ट इंडिजसह या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ सहभागी होणार आहेत. उर्वरित दोन स्थानांसाठी बांगलादेश, हॉलंड, आयर्लंड, पापुआ न्यू गिनीआ, स्कॉटलंड, थायलंड, युगांडा, संयुक्त अरब अमिरात यांच्यात स्पर्धा रंगणार आहे. या सर्व संघांचे पात्रता फेरीचे सामने ३-१४ जुलै दरम्यान नेदरलंड येथे रंगणार आहेत.
