India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा थरार ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला तर दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. भारतीय गोलंदाजांनी एका दिवसात इंग्लंडच्या डाव संपुष्टात आणला. दुसऱ्या दिवशी भारत आणि इंग्लंड यांच्यातील खेळाडूंमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. दरम्यान प्रसिध कृष्णा आणि जो रूट यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत राहिला.
या संपूर्ण मालिकेत जो रूटने दमदार फलंदाजी केली आहे. त्याला बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच कस लागला आहे. पाचव्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी जेव्हा रूट फलंदाजी करत होता त्यावेळी प्रसिध कृष्णा गोलंदाजी करत होता. प्रसिध कृष्णाचा वेगवान चेंडू जो रूट अडवण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू थोडक्यात हुकला. त्यावेळी प्रसिध रूटकडे गेला आणि त्याला काहीतरी बोलताना दिसला.
प्रसिधने डिवचल्यानंतर जो रूटने खणखणीत चौकार मारला. मग रूट प्रसिधला प्रत्युत्तर देताना दिसला. रूट हा आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. या मालिकेत पहिल्यांदाच तो आक्रमक होताना दिसला.
प्रसिध कृष्णा काय म्हणाला?
दोघांमध्ये झालेल्या वादावर बोलताना प्रसिध कृष्णाने अखेर मौन सोडलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर तो म्हणाला, “ रूटने अशी प्रतिक्रिया का दिली मला माहीत नाही. मी त्याला इतकंच म्हणालो होतो की, तू परफेक्ट शेपमध्ये दिसत आहेस. त्यानंतर त्याने फिरून पाहिलं आणि शिवीगाळ केला. हे आम्ही रूटला डिस्टर्ब करण्यासाठी केलं होतं. पण तो अशी प्रतिक्रिया देईल असं आम्हाला मुळीच वाटलं नव्हतं.”
या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव २२४ धावांवर आटोपला. त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या इंग्लंडला पहिल्या डावात २४७ धावा करता आल्या. यासह इंग्लंडने २३ धावांची आघाडी घेतली. दरम्यान या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाअखेर २ गडी बाद ७५ धावा करत ५२ धावांची आघाडी घेतली.