IND-W vs SA-W Final Weather Update and Reserve Day Rules? भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंडचा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर भारतीय महिला संघाने ७ वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघावर ऐतिहासिक विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. जेमिमा रॉड्रीग्ज व हरमनप्रीत कौर भारताच्या विजयाच्या स्टार ठरल्या. पण या सामन्यावर पावसाचं सावट असल्याने सामना रद्द झाल्यास काय होणार, जाणून घेऊया.
भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान मुंबईचं हवामान ( IND W vs SA W Final Weather)
भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ हे विश्वविजेतेपदासाठी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आमनेसामने येतील. वारे आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई आणि आसपासच्या भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. रविवारी होणारा हा ब्लॉकबस्टर सामना जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असला, तरी हवामानाचा अंदाज फारसा अनुकूल नाही.
सामन्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच शनिवारी, सुमारे ८६ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून, दिवसभरात परिस्थितीत थोडी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. रविवारीही समान हवामानाची शक्यता असून सुमारे ६३ टक्के पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. विशेषतः सायंकाळी ४ ते ७ या वेळेत ५० टक्क्यांहून अधिक पावसाची शक्यता आहे.
डी.वाय. पाटील स्टेडियमवर याआधीच भारत-बांगलादेश सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला होता. पण, जर पावसामुळे सामना रद्द झाला तर कोणत्या संघाला विजेता घोषित केलं जाईल? कसं असेल समीकरण.
भारत महिला व दक्षिण आफ्रिका महिला फायनल रद्द झाल्यास विजेता कसा मिळणार? (What If IND-W vs SA-W Final Is Washed Out?)
जर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला विश्वचषकाचा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. पण दोन्ही संघांसाठी ही बातमी चांगली नसणार आहे, कारण दोन्ही संघांपैकी कधीही महिला एकदिवसीय विश्वचषकाचं जेतेपद पटकावलेलं नाही. दक्षिण आफ्रिका प्रथमच अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर भारताने यापूर्वी दोन वेळा अंतिम फेरी गाठली होती, पण दोन्ही वेळा पराभव स्वीकारावा लागला.
महिला वनडे विश्वचषक फायनलसाठी राखीव दिवस आहे का? (Is There a Reserve Day In Place?)
भारत-दक्षिण आफ्रिका सामना रविवारी पावसामुळे थांबवल्यास सोमवारी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, सोमवारीही ५० टक्क्यांहून अधिक पावसाची शक्यता असल्याने सामन्याची षटकं कमी करावी लागली तरी सामना रविवारीच पूर्ण करावा असा पंचांचा प्रयत्न असेल.
