India vs England 4th Test Match Details: शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीच्या ३ कसोटी सामन्यांनंतर इंग्लंडचा संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. त्यानंतर एजबस्टनच्या मैदानावर भारताने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला. मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान मालिकेतील चौथा कसोटी सामना केव्हा, कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या.
भारताचा संघ या मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघाला ही मालिका जिंकायची असेल, तर कुठल्याही परिस्थितीत चौथा सामना जिंकावा लागणार आहे. हा सामना ड्रॉ झाला, तरीदेखील शेवटच्या सामन्यात भारताकडे मालिका बरोबरीत करण्याची संधी असेल.पण भारताचा प्रयत्न हा सामना जिंकण्यावर अधिक असणार आहे. मालिका बरोबरीत आणण्यासाठी भारतीय संघ पूर्ण जोर लावतील.
केव्हा , कुठे आणि कधी होणार सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून सुरू होणार आहे. हा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रफर्ड मैदानावर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. तर सामन्याचं नाणेफेक हे ३ वाजता होईल. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. यासह तुम्हाला हा सामना जिओ हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येणार आहे.
या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:
असा आहे भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
असा आहे इंग्लंडचा संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ , जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, जोश टंग, ख्रिस वोक्स