Karan Sonavale Match vs India: भारतीय संघाने आशिया चषकातील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यूएईवर विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला. यासह भारताने सुपर ४ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान त्याआधी भारतीय संघाचा सामना ओमानविरूद्ध होणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. नवखा ओमानचा संघ भारतीय संघाविरूद्ध कशी कामगिरी करेल याकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. दरम्यान ओमान संघात एक असा खेळाडू आहे, जो मुंबईतील विक्रोळीचा आहे. एकेकाळी भारतीय संघाकडून खेळण्याची स्वप्न पाहणारा हा खेळाडू आता भारतीय संघाविरूद्ध खेळताना दिसणार आहे.
भारताचा सामना ओमानविरूद्ध होण्याआधी एका मराठमोळ्या खेळाडूची चर्चा रंगली आहे. या खेळाडूचं नाव आहे, करण कमलाकर सोनावळे. आशिया चषकासाठी त्याला ओमान संघात स्थान दिलं गेलं आहे. जर त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळाली, तर तो भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसू शकतो. याआधी २०२४ मध्ये स्कॉटलँडविरूद्ध खेळताना त्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
विक्रोळीच्या खेळाडूला ओमानच्या राष्ट्रीय संघात संधी कशी मिळाली?असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. करणने क्रिकेटची पंढरी मुंबईत क्रिकेट खेळायला सुरूवात केली. तो विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर येथे राहतो. क्रिकेटपटू होण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याला ओमानकडून खेळण्याची ऑफर आली होती. आशिया चषकासाठी ओमानच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाल्यानंतर सोनावळे कुटुंबात आणि मित्रपरिवारात आनंदाचं वातावरण आहे.
केव्हा होणार भारत- ओमान लढत?
भारत आणि ओमान हे दोन्ही संघ शूक्रवारी आमनेसामने येणार आहेत. ओमान संघाची जबाबदारी जतिंदर सिंगच्या हाती सोपवण्यात आली आहे. याआधी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये ओमानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये करण सोनावळेला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही. पण भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. जर त्याला भारतीय संघाविरूद्ध खेळण्याची संधी मिळाली, तर तो कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. स्पर्धेतील दोन्ही सामने गमावून ओमानचा संघ सध्या गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.