National Sports Day 2025: भारतात २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून ओळखला जातो. हॉकीचे जादुगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी इलाहाबादमध्ये झाला. मेजर ध्यानचंद यांनी हॉकी या खेळात इतिहास घडवला. लागोपाठ गोल करणं हा त्यांचा डाव्या हाताचा खेळ होता. १९९२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्यांनी अमेरिकेवर २४-१ ने विजय मिळवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. यादरम्यान त्यांनी ८ गोल केले होते. तर संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने एकूण ३५ गोल केले होते. यापैकी २५ गोल हे एकट्या मेजर ध्यानचंद यांचे होते.
भारतात क्रिकेटचा उगम होण्याआधी हॉकीची जोरदार क्रेझ होती. मेजर ध्यानचंद यांनी सर्वांनाच आपल्या खेळाने वेड लावले होते. त्यांचं देशप्रेम इतकं होतं की, त्यांनी चक्क हिटलर यांची ऑफर नाकारली होती.
जेव्हा मेजर ध्यानचंद यांनी फेटाळली हिटलरची ऑफर
हॉकी या खेळातील जादुगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांची ख्याती जगभरात पसरलेली होती. बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेवेळी जर्मनीचा हुकुमशाह हिटलरने ध्यानचंद यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. १९३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन जर्मनीत केले गेले होते.
याआधी झालेल्या १९२८ आणि १९३२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाची जबाबदारी मेजर ध्यानचंद यांच्या हाती होती. या स्पर्धेतील अंतिम सामना १४ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार होता. पण पावसामुळे सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला. १५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या सामन्यातील पूर्वार्धात जर्मनीचा संघ १- ० ने आघाडीवर होता. त्यामुळे उत्तरार्धात भारतीय संघावर दबाव होता.
या सामन्यातील उत्तरार्धात मेजर ध्यानचंद शूजशिवाय मैदानात उतरले. पण त्यांच्या कामगिरीवर याचा काहीच परिणाम झाला नाही. उत्तरार्धात मेजर ध्यानचंद यांनी गोलचा पाऊस पाडला. हा सामना भारताने ८-१ ने आपल्या नावावर केला.
मेजर ध्यानचंद यांचा खेळ पाहून हिटलर प्रसन्न झाला. त्याने मेजर ध्यानचंद यांना भेटण्यासाठी बोलवलं. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. हिटलरने मेजर ध्यानचंद यांना जर्मनीच्या सेनेतील सर्वोच्च पद आणि जर्मनीकडून खेळण्याची ऑफर दिली. पण मेजर ध्यानचंद यांचं देशावर खूप जास्त प्रेम होतं. त्यांनी ही ऑफर फेटाळून लावली.