Why Are England Players Wearing Red Jerseys: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी इंग्लंडची जर्सी बदललेली दिसली. इंग्लंडच्या पांढऱ्या कसोटी जर्सीवर लाल रंगाचा जर्सी नंबर आणि जर्सीही लाल रंगाची दिसली. तर लाल टोपी घालूनही संघ मैदानावर उतरला. यामागचं नेमकं कारण काय आहे, जाणून घेऊया.

कसोटी क्रिकेटमध्ये पांढरी जर्सी असते आणि या जर्सीवरील जाहिराती, रेषा आणि जर्सी नंबर हे काळ्या, निळ्या रंगाचे असतात. यामागचं कारण म्हणजे कसोटी क्रिकेटमधील चेंडू हा लाल रंगाचा असतो. त्यामुळे चेंडू नीट दिसावा म्हणून जर्सीचा रंग वेगळा असतो. पण लॉर्ड्स कसोटी सामन्यात मात्र इंग्लंड संघाच्या जर्सीवरील जाहिराती, रेषा आणि जर्सी नंबर लाल रंगाचे दिसून आले, तर संघाने सामन्याच्या सुरूवातीला लाल रंगाच्या टोपी देखील घातल्या होत्या. फक्त खेळाडूच नव्हे तर सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांनीही लाल टोपी घातल्या आहेत.

लॉर्ड्सवर भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे खेळाडू लाल रंगाच्या टोपी आणि त्यांच्या जर्सीवर लाल रंग दिसत आहे. ही लाल रंगाची जर्सी घालणं हा “रेड फॉर रूथ” नावाच्या खास उपक्रमाचा भाग आहे, जो रूथ स्ट्रॉस फाउंडेशनसाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी आयोजित केला जातो.

इंग्लंड संघाचे दिग्गज माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस यांचं हे फाऊंडेशन आहे. आपल्या पत्नी रूथ यांच्या स्मरणार्थ त्यांनी या फाऊंडेशनची सुरूवात केली होती. २०१८ मध्ये त्यांचे एका दुर्मीळ प्रकारच्या फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे निधन झाले होते.

या उपक्रमाचा उद्देश असा आहे की, अशा प्रकारच्या कर्करोगाचा सामना करणाऱ्या कुटुंबांना मदत करणं आणि जनजागृती करणं, विशेषतः अशा रुग्णांसाठी जे कधीही धूम्रपान करत नव्हते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडने पहिल्या डावात ३८७ धावा केल्या आहेत. इंग्लंडसाठी जो रूटने शतक केलं; तर जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स यांनी अर्धशतकं केली. कार्स आणि स्मिथच्या भागीदारीमुळे इंग्लंडचा संघ ३०० धावांचा पल्ला पार करू शकला. ब्रायडन कार्सने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक झळकावलं. तर भारताकडून बुमराहने पहिल्यांदाच लॉर्ड्सच्या मैदानावर ५ विकेट्स घेतल्या.