Cheteshwar Pujara Retirement: गेल्या २ वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या चेतेश्वर पुजाराने अखेर निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. २०१० मध्ये भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या पुजाराला भारतीय संघासाठी १०३ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. २०२३ मध्ये तो भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण पुनरागमन करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे पुजाराने निवृत्तीचा निर्णय घेतला. दरम्यान निवृत्ती जाहीर केल्यानंतर पुजाराने निवृत्ती जाहीर करण्यामागचं कारण सांगितलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर पुजाराने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ” हा प्लॅन आठवड्याभरापासून सुरू होता. गेल्या काही वर्षांपासून मला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे मला वाटलं हीच योग्य वेळ आहे. कारण युवा खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे . त्यामुळेच मी हा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्याआधी मी कुटुंबातील सदस्य आणि वरिष्ठ खेळाडूंसह चर्चा केली. त्यानंतरच मी हा निर्णय घेतला.”
तसेच तो पुढे म्हणाला, “मी २०१० मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात आठवणीतील क्षण होता. जेव्हा मी २०१० मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना पदार्णप केलं, त्यावेळी ते माझ्यासाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हते. त्यावेळी भारतीय संघात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गौतम गंभीरसारखे दिग्गज खेळाडू होते.”
पोस्ट शेअर करत केली निवृत्तीची घोषणा
पुजाराने रविवारी (२४ ऑगस्ट) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ” भारतीय संघाची जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीत म्हणणं आणि दरवेळी मैदानात उतरून संपूर्ण ताकदीने खेळणं, या भावना शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे. ते म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो. तसंच मी आता भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.” भारतीय संघासाठी १०३ कसोटी सामने खेळल्यानंतर अखेर पुजाराने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.