IND vs AUS 5th T20I Brisbane Weather: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यादरम्यान एक चकित करणारी घटना घडली. गाबामधील सामना अचानक थांबवण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा सामना ब्रिस्बेनमध्ये ऐतिहासिक गाबा मैदानावर खेळवला जात आहे. पण ४.५ षटकांनंतर पंचांनी अचानक सामना थांबवला. त्यानंतर ग्राउंड स्टाफने सर्व खेळाडूंना डगआउट सोडून ड्रेसिंग रूममध्ये जाण्यास सांगितलं, तर प्रेक्षकांनाही जागेवरून उठवून आतमध्ये पाठवण्यात आलं, ज्यामुळे सर्वच जण तणावात दिसले.
ऑस्ट्रेलियाने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यामुळे भारतीय संघाने फलंदाजीने सामन्याला सुरूवात केली. पहिल्याच षटकात अभिषेक शर्माला जीवदान मिळालं. यासह सलामीवीर अभिषेक शर्मा-शुबमन गिल या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी रचली. यासह संघाने ४.५ षटकांत ५४ धावा केल्या. यानंतर सामना अचानक मैदानावर थांबवण्यात आला.
पाऊस आलेला नसतानाही भरारत-ऑस्ट्रेलिया सामना पंचांनी का थांबवला?
खराब हवामानामुळे सामना अचानक थांबवण्यात आला. पंच शॉन क्रेग यांनी आजूबाजूला पाहिलं आणि लगेचच खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये परतण्याचे आदेश दिले. याचं मुख्य कारण म्हणजे स्टेडियमजवळील काही भागात विजा चमकताना दिसल्या आणि हवामानशास्त्रज्ञांच्या अहवालांमुळे सर्वांना सावध केलं.
मैदानातील ग्राऊंड स्टाफने कव्हर मैदानावर लगेच कव्हर आणळे. मुसळधार पावसाचे ढग वेगाने स्टेडियमकडे येत आहेत, असाही संकेत आधीच मिळाला होता. हवामानाच्या तीव्र इशाऱ्यामुळे सामना अचानक थांबवण्यात आला. खेळाडूंना, तसेच स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांना ताबडतोब बाहेर काढण्यात आलं आणि स्टेडियमचा खालचा भाग त्वरित रिकामा करण्यात आला. चाहते पटकन वरच्या टेरेसकडे धावले.
ब्रिस्बेनमधील हवामान अनेकदा असंच रौद्ररूप धारण करतं. सामना थांबवल्यानंतर काही वेळाने अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. ऑस्ट्रेलियामध्ये, खेळाडू आणि चाहत्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन, खराब हवामानामुळे अनेकदा सामने रद्दही करण्यात आले आहेत.
वीज चमकण्याच्या परिस्थितीसाठी काय आहे ICC चा नियम?
पाऊस ही सर्वात सामान्य घटना असली तरी, वीज पडल्यामुळे अनेकदा सामने थांबवण्यात आले आहेत. याचे अलीकडील उदाहरण म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना पावसांच्या गडगडाटामुळे थांबवण्यात आला होता. वीज चमकण्याबाबत आयसीसीने नियम गेल्या ६ वर्षांपासून लागू केला आहे.
“ICCने गेल्या काही वर्षांमध्ये विजेच्या कडकडाटासाठी एक विशेष प्रोटोकॉल लागू केला आहे, ज्याला 30:30 नियम म्हणतात. जर विजेचा प्रकाश आणि गडगडाट यांच्यातील अंतर ३० सेकंदांच्या आत असेल, तर खेळ तत्काळ थांबवला किंवा रद्द केला जातो. कारण या नियमाचा उद्देश म्हणजे खेळाडू, प्रेक्षक, ग्राउंड स्टाफ आणि मैदानावर असलेल्या प्रत्येकाच्या सुरक्षेची खात्री करणे.”
