Why INDW vs PAKW Match Stopped in CWC25: भारत आणि पाकिस्तान यांच्यात महिला वनडे विश्वचषकातील सामना खेळवला जात आहे. भारताकडे स्पर्धेचं यजमानपद असल्याने पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळवले जात आहेत. आज ५ ऑक्टोबरला या कट्टर प्रतिस्पर्धी संघांतील सामन्यान सुरूवातीपासूनच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पाकिस्तानने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीदरम्यान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन केलं नाही. दरम्यान ३५व्या षटकात अचानक सामना थांबवण्यात आला, फार कमी वेळेस मैदानावर असा प्रसंग घडलेला क्रिकेटप्रेमींनी पाहिला असेल.

भारताने फलंदाजीला सुरूवात करत सावध सुरूवात केली. पण पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने स्मृती मानधनाला पायचीत करत भारताला पहिला धक्का दिला. मानधना ४ चौकारांसह २३ धावा करत बाद झाली. स्मृती पुन्हा एकदा या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. तर प्रतिका रावल ३२ धावा करत बाद झाली. यानंतर हरलीनने हरमनप्रीत कौरबरोबर संघाचा डाव सावरला. पण हरमन आणि हरलीनच्या फलंदाजीदरम्यान टीम इंडियाने कर्णधारांकडे एका प्रकरणाची तक्रार केली होती आणि त्यामुळेच सामना ३४व्या षटकानंतर थांबला.

ना पाऊस ना फ्लडलाईट्स… मग का थांबवला भारत-पाकिस्तान सामना?

हरमनप्रीत आणि हरलीन फलंदाजी करतानाच मैदानावर बरेच कीटक दिसत होते. फलंदाजी करताना फलंदाजांच्या डोळ्यासमोर सातत्याने येत होते, ज्यामुळे त्यांना खेळताना त्रास होत होता. तर गोलंदाजीतही पाकिस्तानचे खेळाडू वैतागले होते. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कीटक जवळ येऊ नये म्हणून स्प्रे केला होता. इतकंच नव्हे तर पाकिस्तानच्या कर्णधाराने आणि खेळाडूंनी डगआऊटमधून स्प्रे आणलेला स्ट्राईक एन्डवर स्प्रेदेखील केला. पण कीटकांचं मैदानावरील प्रमाण इतकं होतं की सामन्यादरम्यान लाईव्ह पाहतानाही स्पष्ट दिसत होते.

हळूहळू किटकांना खेळाडूंना होणारा त्रास पाहता कीटकांसाठीचा स्प्रे संपूर्ण मैदानावर करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ३५व्या षटकात सामना १५ मिनिटांसाठी थांबवण्यात आला. यादरम्यान सामन्यांची षटकं कमी झाली नाही, तो वेळ ब्रेकदरम्यान भरून काढला जाईल असं सांगण्यात आलं. ३४ षटकांमध्ये भारताने ४ बाद १५४ धावा केल्या आहेत. जेमिमा आणि दीप्तीची जोडी मैदानावर आहे.