Mohammed Siraj Angrily Shouts at Shubman Gill Video: मोहम्मद सिराज ओव्हल कसोटीत भारताच्या विजयाचा नायक ठरला. पाचव्या दिवशी टाकला गेलेला प्रत्येक चेंडू तितकाच महत्त्वाचा होता. संपूर्ण संघाने फिल्डिंग करतानाही आपलं १०० टक्के योगदान दिलं. सिराजने आपल्या भेदक गोलंदाजीने मोमेंटम भारताच्या दिशेने वळवला होता. पण अखेरच्या षटकांमध्ये एक असा क्षण आला होता जिथे सिराज कर्णधार गिलवरही संतापला होता. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
पाचव्या कसोटीत भारताच्या विजयानंतर शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज पत्रकार परिषदेसाठी आले. तेव्हा पत्रकाराने त्याला विचारलं की शुबमन गिल तुझं ऐकतो की नाही. कारण तुमच्या दोघांमधील एक घटना आम्ही पाहिली, ज्यामध्ये सिराज तुझ्यावर संतापला होता आणि म्हणाला की, ‘तू त्याला सांगितलं नाहीस का?’
मोहम्मद सिराज या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाला, “आमच्यातील संवाद खूप चांगला आहे, आमच्यातील मैत्री पण चांगली आहे. आम्ही दोघंही भारतासाठी एकत्र खेळलो आहोत, तो गुजरात टायटन्सचा कर्णधार देखील आहे, म्हणून मी त्याला नीट ओळखतो आणि मी सांगितलेलं देखील तो ऐकतो.”
शुबमन गिलवर का संतापला होता मोहम्मद सिराज?
भारत आणि इंग्लंडमधील ओव्हल कसोटी सामना चांगलाच रोमांचक झाला. टीम इंडियाला विजयासाठी एका विकेटची गरज होती आणि इंग्लंडला ११ धावा करायच्या होत्या. दरम्यान टीम इंडियासमोर एटकिन्सनला धावबाद करण्याची एक संधी चालून आली होती, पण ती हुकली आणि एटकिन्सन एक धाव घेण्यात यशस्वी ठरला. ध्रुव जुरेलने वेळेत चेंडू फेकला खरा पण तो स्टम्पवर जाऊन आदळला नाही आणि सिराज संतापत गिलला म्हणाला, “तू त्याला सांगितलं नाही का?”
पाचव्या कसोटीत घडलेल्या या घटनेबाबत गिल म्हणाला, “हो, त्याने मला सांगितलं होतं की ध्रुवला सांग, हातातले ग्लोव्हज काढून ठेव, जेणेकरून रनआऊटची संधी आल्यास सोपं जाईल. मी ध्रुवला सांगितलं, पण तोपर्यंत सिराजने रनअप सुरू केला होता, त्यामुळे त्याला ग्लोव्हज काढायला वेळच मिळाला नाही.”
तो रनआऊट हुकलेला पाहता सिराज संतापला आणि तो बोलला की, तू त्याला ग्लोव्हज काढायला सांगितलं नाही का? गिलचं बोलून होताच दोघंही पत्रकार परिषदेत हसू लागले. पण त्यानंतर सिराजने त्याच्या स्पेलमधील पुढच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एटकिन्सनला क्लीन बोल्ड करत संघाला स्वप्नवत विजय मिळवून दिला.