Duleep Trophy Quarter Final: देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार, आजपासून (२८ ऑगस्ट) दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या सामन्यात सेंट्रल झोन संघाचा कर्णधार ध्रुव जुरेल, नॉर्थ झोन संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि इस्ट झोन संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन क्वार्टरफायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेलेले नाही. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

ईएसएनपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार,नॉर्थ झोन संघाचा कर्णधार शुबमन गिल आजारी असल्याने तो क्वार्टर फायनलच्या सामन्यातून बाहेर आहे. गिलच्या अनुपस्थितीत हरियाणाचा फलंदाज अंकित कुमारकडे नॉर्थ झोन संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर गिलच्या जागी शुभम रोहिल्लाला संघात स्थान दिलं गेलं आहे. शुभम हा सर्व्हिसेस संघाचं प्रतिनिधित्व करतो. इंग्लंड दौऱ्याहून परतल्यानंतरही गिल आजारी होता.

ध्रुव जुरेल या सामन्यातून बाहेर पडण्याचं कारण काय?

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलकडे सेंट्रल झोनची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, नॉर्थ इस्ट संघाविरूद्धच्या सामन्यात तो खेळण्यासाठी उतरलाच नाही. तो कंबरेच्या दुखापतीने त्रस्त आहे.त्यामुळे या सामन्यासाठी त्याचा सेंट्रल झोन संघात समावेश करण्यात आलेला नाही. संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली होती. त्यामुळे आता ध्रुव जुरेलच्या अनुपस्थितीत रजत पाटीदार या संघाचं नेतृत्व करत आहे.

अभिमन्यू ईश्वरन बाहेर का?

इस्ट झोन संघालाही मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन ताप आल्यामुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. अभिमन्यू ईश्वरन बाहेर असल्यामुळे या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी संघातील अष्टपैलू खेळाडू रियान परागकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्वार्टर फायनलचा सामना झाल्यानंतर ४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सेमीफायनल सामन्यात ध्रुव जुरेल आणि अभिमन्यू ईश्वरन पुनरागमन करू शकतात. दरम्यान या स्पर्धेतील अंतिम सामना ११ सप्टेंबरला रंगणार आहे. आशिया चषकामुळे गिल पुनरागमन करण्याची शक्यता कमी आहे.