वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ख्रिस गेलने टी -२० क्रिकेट सामन्यामध्ये इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेच्या तिसर्‍या टी -२० सामन्यात गेलने ३८ चेंडूत ६७ धावा केल्या. या दरम्यान गेलने सात षटकार आणि चार चौकार लगावले. ९व्या षटकात अ‍ॅडम झॅम्पांच्या पहिल्या चेंडूवर लाँग ओव्हरवर षटकार ठोकला आणि या मोठ्या शॉटसह त्याने टी -२० सामन्यामध्ये इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेलने या सामन्यामध्ये टी -२० क्रिकेटमध्ये १४,००० धावा पूर्ण केल्या आहेत. टी -२० क्रिकेटमधील १४,००० धावांचा टप्पा गाठणारा ख्रिस गेल जगातील पहिला फलंदाज बनला आहे. या सामन्यापूर्वी गेलच्या खात्यात १३,९७१ धावा होत्या. त्याने ६७ धावांच्या खेळीसह १४,००० धावांचा टप्पा ओलांडला. गेलच्या शानदार फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवला.

सामन्याच्या दुसर्‍या षटकातील शेवटच्या चार चेंडूंमध्ये गेलने १८ धावा केल्या. गेलने शेवटच्या चार चेंडूमध्ये ६,४,४,४ अशी धावा केल्या. ख्रिस गेलने अ‍ॅडम झॅम्पांच्या षटकात सलग तीन षटकार मारून ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. २०१६  नंतर आंतरराष्ट्रीय टी -२० क्रिकेटमधील हे त्याचे पहिले अर्धशतक आहे. टी -२० वर्ल्ड कपमध्ये त्याने शेवटचे अर्धशतक झळकावले होते.

या विजयासह वेस्ट इंडीजने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. टी -२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी ख्रिस गेलची पुनरागमन होणे वेस्ट इंडीज क्रिकेट संघासाठी मोठी दिलासादायक बाब आहे. ख्रिस गेलच्या या शानदार खेळीसाठी त्या मॅन ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले. गेलने आपली ही दमदार खेळी ड्वेन ब्राव्हो आणि कर्णधार कायरन पोलार्डला समर्पित केली आहे. या सामन्यापूर्वी ब्राव्होने गेलसाठी भावनिक पोस्ट शेअर केली होती. गेलने वर्षानुवर्षे संघाचे वजन आपल्या खांद्यावर उचलले आहे आणि आता या संघाची वेळ आली आहे, असे त्यामध्ये लिहिले होते. गेलने सामन्यानंतर सांगितले की ब्राव्हो आणि पोलार्डने कठीण काळात त्याला साथ दिली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १४१ धावा केल्या. मोईसेस हेनरिक्सने ३३ धावा केल्या तर वेस्ट इंडिजकडून हेडन वॉल्श ज्युनियरने १८  धावा देऊन दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने ४२ धावांत दोन गडी गमावले. आंद्रे फ्लेचर आणि लेंडल सिमन्स ४ आणि १५ धावांवर बाद झाले. यानंतर गेल आणि निकोलस पूरन यांनी मिळून वेस्ट इंडिजचा विजय निश्चित केला. पूरण ३२ धावा करुन नाबाद राहिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wi vs aus 3rd t20i match chris gayle back in form complete 14 thousand run in t20 abn
First published on: 13-07-2021 at 09:43 IST