Asia Cup 2025 Match Fee: आशिया चषक २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यावरून सुरू झालेला वाद अद्यापही शमलेला नाही. भारताने २८ सप्टेंबर रोजी पाकिस्तानला एकाच स्पर्धेत तिसऱ्यांदा पराभूत करून आशिया चषक जिंकला. मात्र त्यानंतरही भारताला विजयाची ट्रॉफी मिळालेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हेच आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख आहेत. अंतिम सामन्यानंतर ते ट्रॉफी घेऊन मैदानातून निसटले. या वादावर आता शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. पहलगामचा हल्ला, ऑपरेशन सिंदूर या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सामने झाले होते, या सामन्यातील आर्थिक उलाढालीबद्दल राऊत यांनी भाष्य केले.

आज (३ ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना मोहसीन नक्वी आणि ट्रॉफी वादाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, मला आंतरराष्ट्रीय नियम माहीत नाहीत. त्यामुळे ट्रॉफी वादावर मी अधिक बोलू इच्छित नाही. भारत-पाकिस्तान सामन्याचा आम्ही विचारही केला नव्हता. आम्ही एकही सामना पाहिला नाही. सामना जिंकला की हरला हेही आम्हाला माहीत नाही.

संजय राऊत पुढे म्हणाले, भारत-पाकिस्तान सामन्यातून मिळालेले उत्पन्न बीसीसीआयने भारतीय सैन्याला द्यावे. जवळपास १२०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे सांगितले जाते. ते सैन्याला देण्यात यावेत.

भारतीय क्रिकेट संघाने मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, “आपल्या खेळाडूंनी नक्वींच्या हस्ते करंडक घ्यायला नकार देत, जो प्रखर राष्ट्रवाद दाखवला आणि त्यांच्या मनात शत्रूविषयी असलेला द्वेष दाखवून दिला. आता त्यांनी पाकिस्तान बरोबरच्या सामन्यात जे मानधन मिळाले आहे, ते त्यांनी पहलगामच्या हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबियांना द्यावे. त्यानंतर आम्ही करंडक घ्यावा की नाही, यावर भाष्य करू.

सूर्यकुमार यादव आपली मॅच फी पीडितांना देणार

दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने तो या स्पर्धेतील आपली संपूर्ण मॅच फी भारतीय सशस्त्र दलांना आणि २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यातील पीडितांना देणार असल्याचे जाहीर केले आहे.

पाकिस्तानी संघाची ऑपरेशन सिंदूरच्या पीडितांना मदत

यानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार सलमान अली आगा यानेदेखील ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान प्रभावित झालेल्या ‘नागरिक आणि मुलांसाठी’ मॅच फी दान करण्याची घोषणा केली आहे. “एक संघ म्हणून, आम्ही आमची मॅच फी भारताच्या हल्ल्यात प्रभावित झालेल्या नागरिक आणि मुलांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे आगा याने आशिया चषकाचा अंतिम सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.