कनिष्ठ स्तरावरील टेनिसला चालना देण्यासाठी आयोजित विम्बल्डन दर्जाची टेनिस स्पर्धा भारतात आयोजित होणार आहे. ब्रिटनचा महान खेळाडू टीम हेन्मन ‘रोड टू विम्बल्डन’ या स्पर्धेचा ‘सदिच्छादूत’ असून या महिन्याअखेरीस स्पर्धेसंदर्भात तो नवी दिल्ली आणि मुंबई येथे येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे.
नवी दिल्लीतील आर. के. खन्ना टेनिस केंद्र आणि मुंबईतील राज्य टेनिस संघटना केंद्र येथे १४ वर्षांखालील राष्ट्रीय एकेरी स्पर्धा होणार आहेत. दोन्ही स्पर्धातील अव्वल १६ खेळाडूंना नवी दिल्लीतील विम्बल्डन फाऊंडेशन कनिष्ठ मास्टर्स केंद्रात खेळण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दोन मुले आणि दोन मुलांना लंडनमधील विम्बल्डन येथे होणाऱ्या राष्ट्रीय अंतिम स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. भारतीय टेनिसला चालना देण्यासाठी ऑल इंग्लंड क्लब आणि विम्बल्डन अजिंक्यपद स्पर्धा यांच्याशी अखिल भारतीय टेनिस संघटनेने संयुक्तपणे हा उपक्रम राबवणार आहेत.