राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे ध्येय मी आणि जोश्ना चिनप्पाने बाळगले होते. आता सुवर्णपदक पटकावल्यानंतर आमचे स्वप्न सत्यात उतरले आहे, असे मत भारताला महिला दुहेरी स्क्वॉशमध्ये सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या दीपिका पल्लिकल हिने व्यक्त केले.
ती म्हणाली, ‘‘स्क्वॉश या खेळाचा ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश नसल्याने राष्ट्रकुल ही आमच्यासाठी ऑलिम्पिकइतकीच प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. कोणत्याही प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदक मिळवणे तितके सोपे नसते. या स्पर्धेत सहभागी होतानाच भारतासाठी भरीव कामगिरी करायची, असा चंग मनाशी बांधला होता. भारताला ऐतिहासिक असे सुवर्णपदक जिंकून देता आल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.’’
तामिळनाडू सरकारने ५० लाख रुपयांचे इनाम जाहीर केल्यानंतर दीपिका म्हणाली, ‘‘तामिळनाडूचे सरकार नेहमीच महिलांना आणि क्रीडापटूंना मदत करत असते. जेव्हा इनामाची घोषणा आम्ही ऐकली, तेव्हा मी आणि जोश्ना दोघीही खूप आनंदी झालो होतो. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मी पुन्हा कोर्टवर परतणार आहे.’’