आगामी वर्षात भारतात होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी भारतीय सरकारने आमच्या खेळाडूंच्या सुरक्षेची हमी द्यावी, अन्यथा पाकिस्तान हॉकी विश्वचषकात आपला संघ पाठवणार नाही असा पवित्रा पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष खालिद खोकर यांनी घेतला आहे. पाकिस्तानी संघाची सुरक्षा आणि योग्य वेळत व्हिसा मिळण्यासाठी पाकिस्तान हॉकी फेडरेशन गेले कित्येक महिने प्रयत्न करत आहे. यासाठी पाकिस्तान बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आंतराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांचीही भेट घेतली होती.

अवश्य वाचा – हॉकी विश्वचषकासाठी पाकिस्तानची धावाधाव, व्हिसासाठी नरेंद्र बत्रांना साकडं

“पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष आणि नरेंद्र बत्रा यांच्यात नुकतीच दुबई येथे बैठक झाली. आमच्या सर्व समस्या आम्ही नरेंद्र बत्रा यांच्याजवळ मांडल्या आहेत. आगामी विश्वचषकासाठी आमच्या संघाला सुरक्षा आणि व्हिसा न मिळाल्यास पाकिस्तानचा संघ भारतात खेळण्यासाठी येणार नाही, असंही आम्ही स्पष्ट केलंय.” खालिद खोकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. याआधी भारतात झालेल्या महत्वाच्या स्पर्धांसाठी पाकिस्तानी खेळाडूंना पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांनी व्हिसा मंजूर केला नव्हता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१८ साली भारतात होणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तानचा संघ पात्र ठरला आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही प्रकारचे क्रीडा सामने होत नाहीयेत. त्यामुळे पाकिस्तान हॉकी फेडरेशनच्या भूमिकेवर आंतराष्ट्रीय हॉकी संघटना काय निर्णय घेतेय हे पहावं लागणार आहे.