scorecardresearch

आशिया चषक फुटबॉल स्पर्धा : इराणविरुद्ध भारताचे पारडे जड

भारताच्या गटात चीन आणि चायनीज तैपेईचाही समावेश आहे.

आशिया चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून प्रारंभ

नवी दिल्ली : एएफसी महिला आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या उद्देशाने यजमान भारतीय संघ सज्ज झाला आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुरुवारी भारताची सलामी इराणशी आहे. जागतिक क्रमवारीत भारत ५५व्या आणि इराण ७७व्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे भारताचे पारडे जड मानले जात आहे.

१९७९नंतर आशिया खंडातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे दुसऱ्यांदा यजमानपद सांभाळणाऱ्या भारतीय संघाने १९७९ आणि १९८३मध्ये उपविजेतेपद पटकावले होते, तर १९८१मध्ये तिसरे स्था मिळवले होते. इराणविरुद्धची पहिली लढत जिंकल्यास भारताला अ-गटातून किमान तिसरे स्थान गाठता येईल. तीन गटांमधील दोन तिसऱ्या स्थानांवरील संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. भारताच्या गटात चीन आणि चायनीज तैपेईचाही समावेश आहे.

’ वेळ : सायं. ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : युरोस्पोर्ट

उपांत्यपूर्व फेरी गाठल्यास बक्षीस -पटेल

भारतीय संघाने आशिया चषक स्पध्रेची उपांत्यपूर्व फेरी गाठल्यास संघातील सर्व खेळाडूंना भरघोस रकमेचे बक्षीस देऊन गौरवण्यात येईल, अशी घोषणा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल यांनी बुधवारी केली़ याचप्रमाणे त्यांनी भारतीय संघाला शुभेच्छाही दिल्या.

दोन खेळाडूंना करोनाची लागण

जैव-सुरक्षा परिघातील भारतीय महिला संघामधील दोन खेळाडूंच्या करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे संयोजकांनी या दोन खेळाडूंना वैद्यकीय सुविधा असलेल्या विलगीकरणात दाखल केले आहे. ‘‘प्रत्येक संघात १३ खेळाडू सुरक्षित असेपर्यंत सामना खेळवण्यात कोणतीही अडचण नाही,’’ असे पटेल यांनी सांगितले. या स्पध्रेसाठी प्रत्येक संघात करोनाच्या पार्श्वभूमीवर २३खेळाडूंचा समावेश आह़े.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women s asian cup indian women seek winning start against iran zws