खून, दरोडे, बलात्कार अशा घटनांसाठी उत्तर प्रदेश कुप्रसिद्ध असल्यामुळे त्याची खेळाडूंवरही दहशत असल्याचा प्रत्यय एका स्पध्रेनिमित्ताने आला आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे २० ते २७ एप्रिलदरम्यान आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी नाव दाखल केलेल्या ८० महिला खेळाडूंनी सुरक्षेचे कारण देत माघार घेतली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर खेळाडूंनी माघार घेतल्याने स्पर्धा कशी होणार? असा प्रश्न संयोजकांना पडला आहे. कायदा आणि सुव्यवस्था योग्य असल्याचा उत्तर प्रदेश सरकारचा दावाही खेळाडूंना विश्वासार्ह वाटलेला नाही.
प्रसारमाध्यमातून कळणाऱ्या बातम्यांमुळेच खेळाडूंनी हा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता उत्तर प्रदेश टेनिस संघटनेचे खजिनदार जे.एस. कौल यांनी व्यक्त केली. या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, स्वीडन, फ्रान्स, थायलंड, युक्रेन, सर्बिया, रशिया, जपान, इंग्लंड, जर्मनीमधील महिला खेळाडू सामील होणार आहेत.