scorecardresearch

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : ऑस्ट्रेलियापुढे भारतीयांचा कस ; मानधना, हरमनप्रीतकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा

न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक स्पर्धेपूर्वी झालेल्या मालिकेत भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नव्हती.

ऑकलंड : भारतीय संघाला महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या मोहिमेला पुन्हा रुळावर आणायचे असल्यास शनिवारी बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या लढतीत सर्वच विभागांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.

न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक स्पर्धेपूर्वी झालेल्या मालिकेत भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या खात्यावर दोन विजय आणि दोन पराभव आहेत. या सामन्यांत फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळाले नाही.

भारताला अजून तीन लीग सामने खेळायचे आहेत आणि आघाडीच्या चार संघांत स्थान मिळवायचे झाल्यास संघाला कामगिरी उंचवावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चारही सामने जिंकले आहेत.

मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या चुरशीच्या मालिकेत पराभूत व्हावे लागले; पण भारताने त्यांची सलग २६ विजयांची मालिका खंडित केली होती. भारतीय फलंदाजांना एकत्रितपणे चांगली कामगिरी करता आलेली नाही. मिताली आणि दीप्ती शर्मा यांना चार सामन्यांत विशेष योगदान देता आलेले नाही; पण स्मृती व हरमनप्रीतला निर्णायक क्षणी सूर सापडल्याचा फायदा संघाला होईल. या दोन्ही खेळाडूंनी वेस्ट इंडीजविरुद्ध शतकी खेळी केली होती. आपल्या २००व्या एकदिवसीय सामन्याच्या उंबरठय़ावर असलेल्या झुलन गोस्वामीने तीन सामन्यांत चमक दाखवली. फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडनेदेखील चांगली गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांना रॅचेल हेन्सला बाद करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तिने आतापर्यंत ९२ च्या सरासरीने २७७ धावा केल्या आहेत. एलिस पेरीने आतापर्यंत अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवण्याकरिता विशेष मेहनत घ्यावी लागेल.

’ वेळ : सकाळी ६.३० वा. 

’ थेट प्रक्षेपण :स्टार स्पोर्ट्स २

भागिदाऱ्या महत्त्वाच्या -मानधना

ऑकलंड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात फलंदाजांनी भागीदाऱ्या महत्त्वाच्या ठरतील, असे स्मृती मानधना म्हटले आहे. ‘‘सलग गडी बाद झाल्याचा फटका भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत बसला आहे. आमचे गडी सलग बाद होत आहेत. त्यामुळे फलंदाजीत सुधार करून ५० षटके फलंदाजी करणे गरजेचे आहे. यासोबतच मोठी भागीदारी रचणेदेखील आवश्यक आहे. एक किंवा दोन चांगल्या भागिदाऱ्या झाल्यास चांगली धावसंख्या उभारता येऊ शकते,’’ असे स्मृतीने सांगितले. आतापर्यंत मानधनाने स्पर्धेत भारताकडून २१६ धावा केल्या आहेत. २०१७च्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले होत़े

वेस्ट इंडिजची खेळाडू रुग्णालयात

माऊंट माँगानुई : वेस्ट इंडिजची जलदगती गोलंदाज शमिलिया कोनेल शुक्रवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानावर कोसळली आणि नंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. बांगलादेशच्या डावातील ४७व्या षटकादरम्यान घडलेल्या घटनेचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. नंतर रुग्णालयात जाण्यापूर्वी मैदानावर वैद्यकीय चमूने तिची तपासणी केली. त्यामुळे काही काळ खेळात खंड पडला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Womens cricket world cup 2022 india face toughest challenge against australia zws