INDIA won Women’s World Cup 2025: रविवारी २ नोव्हेंबर रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक जिंकून इतिहासात आपलं नाव कोरलं आहे. या खेळातले दोन तेजस्वी तारे जेमिमा रॉड्रिग्ज आणि दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड यांचा एक जॅमिंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून मित्र ते खेळात आमनेसामने असलेले खेळाडू कसे असतात अशा कमेंट्स सध्या व्हायरल होत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका केव्हाचा आहे याबाबत युजर्स कमेंट करून विचारत आहेत. स्काय स्पोर्ट्स क्रिकेटने एक दिवसापूर्वी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये भारताची खेळाडू जेमिमा गिटार वाजवत असल्याचे दिसत आहे आणि लॉरा वोल्वार्डट तिच्या सुंदर आवाजात गाणं गात आहे. द हंड्रेडमधील सुपरचार्जर्स जर्सी परिधान करत दोन्ही खेळाडूंनी हा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. स्काय स्पोर्ट्स क्रिकेटने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला “जॅमिंग बड्सपासून ते वर्ल्ड कप प्रतिस्पर्धीपर्यंत?… जेमिमा रॉड्रिग्ज आणि लॉरा वोल्वार्डट किती टॅलेंटेड आहेत?” अशा कॅप्शनसह शेअऱ केला आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
हा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच लोकांनी या दोघींचं कौतुक करत भरपूर कमेंट्स केल्या आहेत. खेळ नेमका हाच आहे अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर काहींनी या दोघींचा प्रामाणिकपणा आणि खेळाडू वृत्ती टिपत त्यांचं कौतुक केलं आहे. एका युजरने विचारले की, “हा व्हिडीओ कालच्या सामन्यापूर्वीचा आहे का?” “लॉराचा आवाज तिच्या कव्हर ड्राइव्हइतकाच सुंदर आहे”, असेही एका युजरने म्हटले आहे. “महिला क्रिकेटमधील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे स्पर्धा असूनही प्रत्येकजण चांगले मित्रही बनतात”, अशी कमेंट एका युजरने केली आहे.
भारतासाठी एक ऐतिहासिक रात्र
नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हरमीनप्रत कौरच्या भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून देशाचा पहिला आयसीसी महिला विश्वचषक जिंकला. दरम्यान, या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने दक्षिण आफ्रिकेची फलंदाज नादिन डी क्लर्क हिचा झेल टिपला आणि भारताने या सामन्यात विजय मिळवला.
