Big Blow to India in Women’s World Cup 2025: भारतीय महिला संघाने वनडे विश्वचषक २०२५ च्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामना ३० ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. भारताची फॉर्मात असलेली सलामीवीर आणि शतकी खेळी केलेली फलंदाज स्पर्धेबाहेर झाली आहे. तिच्या जागी बदली खेळाडूचीही घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल विश्वचषकातील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडली आहे. बांगलादेशविरुद्ध गट टप्प्यातील अखेरच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना उजव्या पायाला दुखापत झाली. यानंतर ती फिजिओचा आधार घेत मैदानाबाहेर गेली.

क्षेत्ररक्षण करताना प्रतिकाचा उजवा पाय मुरगळला, त्यानंतर ती बांगलादेशविरुद्ध सामन्यात फलंदाजीसाठी आली नाही आणि आता ती ३० ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळू शकणार नाही, याबाबत अधिकृत अपडेट समोर आली आहे. प्रतिका रावल स्पर्धेबाहेर होणं ही टीम इंडियासाठी खूप वाईट बातमी आहे कारण ही खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये होती.

प्रतिका रावलने तिच्या पहिलाच एकदिवसीय विश्वचषकाच फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. ती चांगल्या फॉर्मातही होती, तिने पहिल्याच वर्ल्डकप स्पर्धेत शतक झळकावण्याचा विक्रमही केली. प्रतिकाने ७ सामन्यांमध्ये ३०८ धावा केल्या आहेत, तर एक शतक आणि एक अर्धशतकही झळकावलं आहे.

प्रतिका रावलच्या जागी आता भारताची जुनी सलामीवीर शफाली वर्माला संधी देण्यात आली आहे, ICCने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. शफाली वर्माने भारतासाठी २९ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि २३ च्या सरासरीने ६४४ धावा केल्या आहेत. तिने वनडे कारकिर्दीत चार अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये नाबाद ७१ धावा ही तिची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तिने ऑक्टोबर २०२४ मध्ये अहमदाबाद येथे न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.