जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचा थरार आजपासून

दोहा : नीरज चोप्रा आणि हिमा दास या दोन नामांकित खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघ शुक्रवारपासून दोहा येथे सुरू होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. मात्र या स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकाच्या कोणत्याही अपेक्षा बाळगल्या जात नाहीत.

मे महिन्यात घोटय़ाच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर जागतिक कीर्तीचा भालाफेकपटू नीरज चोप्राने काही दिवसांपूर्वीच सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे तो ६ ऑक्टोबपर्यंत रंगणाऱ्या जागतिक स्पर्धेत सहभागी होणार नाही.

भारताच्या प्राथमिक संघात समावेश करूनही धावपटू हिमा दास हिने पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. गेले चार महिने या स्पर्धेसाठी ती युरोपमध्ये सराव करत होती. त्यामुळे तिच्या माघारीचा मोठा फटका भारताला बसणार आहे. तिच्या दुखापतीमुळे भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघावर (एएफआय) कडाडून टीका झाली.

भारतीय खेळाडूंकडून पदकाच्या अपेक्षा नसल्या तरी किती जण अंतिम फेरीत धडक मारतील, हेसुद्धा ‘एएफआय’ सांगू शकत नाही. पण जागतिक स्पर्धेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ४ बाय ४०० मीटर रिले तसेच ४ बाय ४०० सांघिक रिले संघाकडून ‘एएफआय’ला मोठय़ा अपेक्षा आहेत. अंजू बॉबी जॉर्ज हिने २००३मध्ये लांब उडीत पटकावलेले कांस्यपदक हे या स्पर्धेतील भारताचे अखेरचे पदक ठरले आहे.

२०१७च्या जागतिक स्पर्धेत दविंदर सिंग कांग (पुरुषांच्या भालाफेक प्रकारात) या एकमेव खेळाडूने अंतिम फेरीत मजल मारली होती. सध्याच्या २७ जणांच्या भारतीय संघात रिले संघातील १३ खेळाडूंचा समावेश असून राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनास याने जागतिक स्पर्धेसाठीचा पात्रता निकष पार केला असला तरी त्याचा ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत समावेश करण्यात आला नाही. रिले प्रकारात अंतिम आठ जणांमध्ये मजल मारणाऱ्या जोडीला २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकचे स्थान निश्चित करता येणार आहे.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एम. श्रीशंकर (उंचउडी पात्रता फेरी) मैदानात उतरणार असून त्यानंतर ४०० मीटर अडथळा शर्यतीत धारून अय्यासामी आणि जेएम. पिलायिल हे ४०० मीटर अडथळा शर्यतीत सहभागी होतील. दुसऱ्या दिवशी सर्वाच्या नजरा द्युती चंद आणि ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघाकडे लागलेल्या आहेत.

भारतीय संघ

पुरुष : जबीर एमपी (४०० मीटर अडथळा शर्यत), जिन्सन जॉन्सन (१५०० मीटर), अविनाश साबळे (३००० मीटर स्टिपलचेस), के. टी. इरफान आणि देवेंदर सिंग (२० किमी. चालण्याची शर्यत), गोपी टी. (मॅरेथॉन), श्रीशंकर एम. (लांबउडी), तजिंदर पाल सिंग तूर (गोळाफेक), शिवपाल सिंग (भालाफेक), मोहम्मद अनास, निर्मल टॉम, अ‍ॅलेक्स अँथोनी, अमोज जेकब, के. एस. जीवन, धारून अय्यासामी, हर्ष कुमार (पुरुष ४ बाय ४०० मीटर रिले आणि मिश्र रिले)

महिला : पी. यू. चित्रा (१५०० मीटर), अन्नू राणी (भालाफेक), अर्चना सुसींद्रन (२०० मीटर), अंजली देवी (४०० मीटर), द्युती चंद (१०० मीटर), विस्मया व्ही. के., पूवाम्मा एम. आर., जिस्ना मॅथ्यू, रेवती व्ही., सुभा वेंकटसन, विथ्या आर. (४ बाय ४०० मीटर महिला आणि मिश्र रिले)

 

हिमाच्या माघारीमुळे कोणताही फरक पडणार नाही. भारताचा मिश्र रिले संघ ४ बाय ४०० मीटर प्रकारात अंतिम फेरी गाठेल, असा आम्हाला विश्वास आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– राधाकृष्णन नायर, भारताचे मुख्य प्रशिक्षक