World Badminton Championships 2018 : चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची आघाडीची टेनिसपटू पी व्ही सिंधू हिने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज या सामन्याआधी भारताची फुलराणी सायना नेहवाल हिनेही विजयी घोडदौड सुरु ठेवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे आता भारतीय चाहत्यांना दुहेरी आनंद मिळाला आहे.
आज झालेल्या सामन्यात सिंधूने अत्यंत सुंदर खेळ केला. पहिला गेम सिंधूने अतिशय सहज जिंकला. या गेममध्ये तिने २१-१० असा तब्बल ११ गुणांचा फरक राखला. पण दुसरा गेम मात्र थोडा संघर्षपूर्ण झाला. या गेममध्ये संग जी ह्युंग हिने आपल्या क्रमवारीतील स्थानाला साजेसा खेळ करत झुंज दिली. पण अखेर उत्तम लयीत असलेल्या सिंधूने २१-१८ अशा फरकाने तिला पराभूत केले आणि सामना जिंकला.
पुढील फेरीत तिचा सामना जपानच्या नोझुमी ओकुहरा हिच्याशी होणार आहे.