अखेरच्या दिवशी रेहमानला रौप्य आणि राजेंद्रनला कांस्य; पुरुष विभागात भारत तिसरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखेरच्या दिवशी हिजबूर रेहमानने रौप्यपदक (१०० किलोवरील) आणि मणि राजेंद्रनने (९० किलोखालील) कांस्यपदक मिळवत भारताच्या खात्यात दोन पदकांची भर घातली. त्यामुळे आठव्या जागतिक शरीरसौष्ठव स्पध्रेत भारताला एकंदर पदकांची दशकपूर्ती (३ सुवर्ण, ३ रौप्य, ४ कांस्य) करता आली. याशिवाय पुरुषांच्या एकंदर पदक क्रमवारीत भारताने तिसरे स्थान मिळवले.

शरीरसौष्ठव विभागात १०० किलोवरील गटात भारताच्या हिजबुल रेहमानने रौप्यपदक मिळवण्याची किमया साधली. प्रीतम सिंगला अंतिम फेरीसुद्धा गाठता आली नाही. इराणच्या महदी सबझेवरीला सुवर्ण, तर ऑस्ट्रियाच्या अर्मिन गानल याला कांस्यपदक मिळाले. ९० किलोखालील गटात मणी राजेंद्रनने कांस्यपदक पटकावले, तर राहुल बिश्तला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. इराणच्या रझा फैझिमाझराइहला सुवर्ण आणि युक्रेनच्या कार्पूक मायकोला रौप्यपदक मिळाले. प्रमोद सिंग, विनय पांडे, के. लवलीन आणि अमित पाटील अपयशी ठरले. १०० किलोखालील गटात किरण पाटील पाचव्या क्रमांकापर्यंत मजल मारू शकला. तथापि, सेंथिल कुमारन, सागर जाधव, परवेझ आलम, रमेश मस्सीलमानी आणि नीलेश दगडे यांनी घोर निराशा केली. तंदुरुस्तीशी निगडित विभागातील अ‍ॅथलेटिक शरीरसंपदा पुरुष गटात धनंजय सिंग चरक आणि निर्भय वाधवा अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरले.

 थायलंडचे दोन्ही विभागांत वर्चस्व

यजमान थायलंडचे जागतिक शरीरसौष्ठव स्पध्रेच्या दोन्ही गटांमध्ये वर्चस्व दिसून आले. त्यांनी या स्पध्रेत एकंदर ३२ पदकांची (१३ सुवर्ण, १३ रौप्य, ६ कांस्य) कमाई केली. पुरुषांमध्ये सर्वाधिक ८७० गुणांसह त्यांनी अव्वल स्थान पटकावले. इराणला दुसरे स्थान मिळवता आले, तर दहा पदके मिळवणाऱ्या भारताने तिसऱ्या स्थानावर मुसंडी मारली. मागील जागतिक शरीरसौष्ठव स्पध्रेत भारताला ११ पदके मिळवली होती. महिलांमध्ये ३२५ गुणांसह थायलंडला पहिले स्थान मिळाले. युक्रेनने दुसऱ्या स्थानावर शिक्कामोर्तब केले, तर हंगेरीला तिसरे स्थान मिळाले.

इराणचा महदी सबझेवरी चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन

गेली अनेक वष्रे ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’ पुरस्कारावर असलेली इराणची मक्तेदारी यंदा पुन्हा एकदा सिद्ध झाली. महदी सबझेवरी निर्विवादपणे या किताबाला गवसणी घातली. अंतिम फेरीतील सुवर्णपदक विजेत्यांमधील तिन्ही उच्च वजनी गटात इराणचेच वर्चस्व होते. त्यामुळे रझा फैझिमाझराइहला (९० किलो), मोर्तझा शाहहुसेनी (१०० किलो) आणि महदी सबझेवरी (१०० किलोवरील) यांच्यातच प्रमुख स्पर्धा होती. मात्र आशियाई शरीरसौष्ठव स्पध्रेत ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’ किताब प्राप्त करणाऱ्या महदीच्या शरीरसंपदेपुढे कुणाचाच निभाव लागला नाही. त्यामुळे पंचमंडळींनीही त्याच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. जगज्जेतेपदासह ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’ही ठरल्यामुळे महदीला अश्रू आवरणे कठीण गेले. त्यानंतर इराणी खेळाडू, प्रशिक्षक आणि समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World bodybuilding championship 2016
First published on: 05-12-2016 at 02:44 IST