स्टॅव्हेंजर (नॉर्वे) : पारंपरिक बुद्धिबळ शैलीत खेळताना सरस प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्याची क्षमता असलेला जगज्जेता भारतीय ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेश आणि अर्जुन एरिगेसी हे नव्या आव्हानासाठी सज्ज झाले आहेत. आजपासून नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात होत असून, गुकेश, एरिगेसीवर भारताच्या आशा अवलंबून असतील. पुरुष महिलांना समान पारितोषिक रक्कम देणारी ही एकमेव स्पर्धा असून, विजेत्यांना एक लाख ६२ हजार डॉलर इतके पारितोषिक मिळणार आहे.

महिला विभागात भारताच्या आशा कोनेरु हम्पी आणि आर. वैशाली यांच्यावर अवलंबून असणार आहेत. पुरुष विभागात अर्जुन, गुकेश यांच्यासमोर आता पाच वेळचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन, तसेच अमेरिकेचा हिकारू नाकामुरा यांचे तगडे आव्हान असेल.

या स्पर्धेला २०१३ मध्ये सुरुवात झाल्यापासून प्रथमच भारताचे दोन खेळाडू सहभागी होत आहेत. यापूर्वी भारताच्या विश्वनाथन आनंदने या स्पर्धेत सहभाग घेतला होता, तेव्हा सर्वोत्तम दहा खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग असायचा. आनंद २०१५ मध्ये या स्पर्धेचा उपविजेता राहिला होता. या वेळी भारताला विजेतेपदाची अधिक चांगली संधी आहे.

गुकेश आणि अर्जुन या दोघांची अलीकडच्या काळातील कामगिरी बघितली, तर त्यांना वेगळ्या प्रेरणेची किंवा आत्मविश्वासाची गरज नाही. यापूर्वी येथे सहा वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या कार्लसनचा सामना करण्याची क्षमता भारताच्या या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे.

स्पर्धेतील भारताच्या चार खेळाडूंचा सहभाग हा भारताची या खेळातील वाढलेली ताकद दाखवून देतो. त्यामुळे कार्लसन, नाकामुरा आणि महिला विभागातील जू वेंजून आणि ली टिंगजी यांना रोखण्याची ताकद भारतीय खेळाडूंमध्ये आहे. साहजिकच एक रोमांचक दंद्व येथे पाहायला मिळेल, असा बुद्धिबळतज्ज्ञांचा अंदाज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुकेश आणि एरिगेसी अनुक्रमे जागतिक क्रमवारीत तिसऱ्या चौथ्या स्थानावर म्हणजेच कार्लसन आणि नाकामुरा यांच्या मागे आहेत. या दोघांचा संयम आणि बचाव भेदण्यासाठी भारतीय खेळाडूंनी प्रचंड धैर्याने खेळावे लागेल आणि अजोड सहनशक्ती दाखवावी लागेल. कारण विश्वविजेतेपदानंतर गुकेशला आपला प्रभाव कायम राखता आलेला नाही. महिला विभागात हम्पी, वैशालीसमोर अर्थातच जू वेन्जून आणि टॅन झोंगी यांचे आव्हान असेल. हम्पी आणि वेन्जून यांच्यातील लढत विजेतेपद कोण जिंकू शकते हे ठरवू शकते. गेल्या दोन देशकांत बुद्धिबळाच्या पटावर जणू या दोघी पारंपरिक प्रतिस्पर्धी बनून राहिल्या आहेत.