WCL 2025: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स या स्पर्धेला दमदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिलाच सामना पाकिस्तान चॅम्पियन्स आणि इंग्लंड चॅम्पियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्स संघाने बाजी मारली. तर स्पर्धेतील दुसरा सामना वेस्ट इंडिज चॅम्पियन्स आणि दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना एजबस्टनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक खेळ पाहायला मिळाला. शेवटी सामना बरोबरीत समाप्त झाला. टी – २० क्रिकेटमध्ये सामना बरोबरीत संपल्यानंतर सुपर ओव्हर खेळवली जाते. पण २००७ नंतर पहिल्यांदाच बॉल आऊटचा थरार रंगला.
या सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे टी -२० सामना ११-११ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाला ७९ धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ लुईस नियमानुसार सामना जिंकण्यासाठी ८१ धावा करायच्या होत्या. मात्र, हा सामना बरोबरीत समाप्त झाला. मग काय, टी -२० क्रिकेटमध्ये २००७ नंतर पहिल्यांदाच बॉल आऊटचा थरार पाहायला मिळाला. ज्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा निशाणा हुकला. पण दक्षिण आफ्रिकेच्या दोन गोलंदाजांनी अचूक निशाणा लावून यष्टी उडवली. यासह दक्षिण आफ्रिकेने पहिल्या विजयाची नोंद केली होती.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना लेंडल सिमन्सने २८ आणि वॉल्टनने २७ धावांची वादळी खेळी केली. तर ख्रिस गेल, स्मिथ आणि पोलार्ड हे स्वस्तात माघारी परतले.
शेवटच्या षटकातील थरार
या सामन्यातील शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ९ धावा करायच्या होत्या. सुरुवातीच्या ३ चेंडूंवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ७ धावा वसूल केल्या होत्या. शेवटी ३ चेंडू आणि २ धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर स्मट्स त्रिफळाचित होऊन माघारी परतला. त्यानंतर मॉर्ने वेन देखील झेलबाद होऊन माघारी परतला. शेवटच्या चेंडूवर १ धाव घेतली गेली. त्यामुळे सामना बरोबरीत समाप्त झाला.
बॉल आऊटमध्ये दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी
सामना बरोबरीत संपल्यावर दोन्ही संघातील गोलंदाजांना ५- ५ चेंडू हिट करण्याची संधी मिळाली. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या २ गोलंदाजांचे चेंडू यष्टीला जाऊन धडकले. तर वेस्ट इंडिजच्या एकही गोलंदाजाचा चेंडू यष्टीला जाऊन लागला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना आपल्या नावावर केला.