अस्ताना : रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोम्नियाशीने सोमवारी जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या दुसऱ्या डावात काळय़ा मोहऱ्यांनिशी खेळताना चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेनवर २९ चालींमध्येच विजय मिळवला. यासह नेपोम्नियाशीने जागतिक अजिंक्यपद लढतीत आघाडी घेतली आहे.
नेपोम्नियाशी आणि लिरेन यांच्यातील रविवारी झालेला पहिला डाव बरोबरीत सुटला होता. दुसऱ्या डावात मात्र नेपोम्नियाशीने अप्रतिम खेळ केला. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या लिरेनला वेळेचे योग्य नियोजन करता आले नाही. त्याने आपल्या चाली खेळण्यासाठी बराच वेळ घेतला. त्यामुळे त्याच्यावर दडपण आले आणि त्याने चूक केली. पुढे सी१चा धोका लक्षात घेऊन २९व्या चालीअंती लिरेनने पराभव स्वीकारला. त्यावेळी त्याच्याकडे पुढील चाली रचण्यासाठी एका मिनिटाहूनही कमी वेळ शिल्लक होता.
जागतिक अजिंक्यपद लढतीत २०१४ नंतर प्रथमच एखाद्या खेळाडूला दुसऱ्या डावात विजय मिळवण्यात यश आले. २०१४मध्ये मॅग्नस कार्लसनने विश्वनाथन आनंदला पराभूत केले होते. तसेच काळय़ा मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या खेळाडूने २००६ नंतर प्रथमच दुसऱ्या डावात विजयाची नोंद केली.
नेपोम्नियाशीने आव्हानवीरांच्या (कॅन्डिडेट्स) स्पर्धेतही काळय़ा मोहऱ्यांनी खेळताना लिरेनवर सरशी साधली होती. मात्र, त्यानंतर लिरेनने दमदार पुनरागमन करताना स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले होते. त्यामुळे नेपोम्नियाशीला पुढील फेऱ्यांमध्येही सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
कोणत्याही जागतिक अजिंक्यपद लढतीतील हा सर्वात निराशाजनक डाव होता. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या डिंग लिरेनच्या चाली फारच अनपेक्षित होत्या. पहिल्या डावापासून तो दडपणाखाली दिसतो आहे. त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता जाणवते आहे. दुसऱ्या डावातील त्याची चौथी चाल एच३ होती. या चालीमुळे तो अडचणीत सापडला. मग नेपोम्नियाशीने ११व्या चालीत वर्चस्व मिळवले. लिरेनला आपण अडचणीत सापडल्याचे लक्षात आले नाही आणि त्याच्या पुढील चालीही फारशा प्रभावी ठरल्या नाहीत. – प्रवीण ठिपसे, ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू
