भुवनेश्वर कुमारला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद शमीने भारतीय संघात आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रीकसह नोंदवलेले ४ बळी आणि विंडीजविरुद्धच्या सामन्यात ४ बळी घेत डावाला पाडलेलं खिंडार या कामगिरीमुळे शमीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होतो आहे. मध्यंतरीच्या काळात फिटनेस आणि पत्नी हसीन जहाँसोबत झालेल्या वादामुळे शमीची कामगिरी खालावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – World Cup 2019 : मला संधी द्या, हार्दिकला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनवतो !

मात्र या सर्व गोष्टींवर मात करुन शमीने आपलं महत्व सिद्ध केलं आहे. सामना संपल्यानंतर शमीला त्याच्या या कामगिरीचं श्रेय कोणाला देणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शमी म्हणाला, “या चांगल्या कामगिरीचं श्रेय हे मलाच जातं. गेल्या काही महिन्यांमध्ये मी अनेक गोष्टींचा सामना केला आहे. मी जे काही भोगलं त्याचा मला मधल्या काळात प्रचंड त्रास झाला. त्यामुळे या कामगिरीचं श्रेय हे मला आणि मी घेतलेल्या मेहनतीला जातं.”

अवश्य वाचा – World Cup 2019 : धोनीच्या संथ खेळीचं जसप्रीत बुमराहकडून समर्थन

“देवाच्या कृपेने मी या सर्व गोष्टींचा सामना केला. घरी निर्माण झालेली तणावाची परिस्थिती ते फिटनेस मी सर्व गोष्टींना धीराने सामोरा गेलो. त्यामुळे देशासाठी चांगली कामगिरी करायची हे एकमेव ध्येय सध्या माझ्या डोळ्यासमोर आहे.” शमी सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत होता. विंडीजविरुद्ध सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतासमोर रविवारी यजमान इंग्लंडचं आव्हान असणार आहे.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2019 i credit myself for this turn around says mohammed shami psd
First published on: 28-06-2019 at 17:58 IST