‘प्रो कबड्डी लीग’ ही आयपीएलप्रमाणे फ्रेंचायझींवर आधारित कबड्डी स्पर्धा आठवडय़ाभरावर आली असताना ‘वर्ल्ड कबड्डी लीग’ची चर्चासुद्धा जोरदार रंगते आहे. ‘प्रो कबड्डी लीग’चे प्रक्षेपणकर्ते स्टार स्पोर्ट्स आणि ‘वर्ल्ड कबड्डी लीग’चे सोनी सिक्स यांच्यातील जाहिरातबाजीसुद्धा ऐन रंगात आली आहे. ‘प्रो कबड्डी’मध्ये जयपूर पिंक पँथर्स संघाची मालकी अभिनेता अभिषेक बच्चनकडे आहे, तर ‘वर्ल्ड कबड्डी लीग’मध्ये अक्षयकुमार, सोनाक्षी सिन्हा आणि यो यो हनी सिंग यांनी संघ खरेदी करून सर्वाचे लक्ष वेधले आहे. पण ‘प्रो कबड्डी लीग’ ही स्पर्धा आयताकृती मैदानावर देशभरात खेळली जाणारी, तर ‘वर्ल्ड कबड्डी लीग’ ही सर्कल कबड्डी, जी प्रामुख्याने पंजाब, हरयाणा या भागात खेळली जाते. ‘प्रो कबड्डी लीग’ने मान्यतेचे सर्व सोपस्कार पूर्ण केले असले तरी ‘वर्ल्ड कबड्डी लीग’ मात्र मान्यतेशिवायच मैदानावर अवतरणार आहे. त्यामुळे ‘वाडा’नेही या स्पध्रेची उत्तेजक चाचणी घेण्यास नकार दिला आहे.
१० आंतरराष्ट्रीय संघ, ९४ सामने यांच्यासह चार खंडांतील सात देशांमध्ये ‘वर्ल्ड कबड्डी लीग’ ही सर्कल कबड्डी स्पर्धा रंगणार आहे. ९ ऑगस्टपासून सुरू होणारा हा उत्सव डिसेंबपर्यंत चालणार आहे. परंतु भारतीय हौशी कबड्डी महासंघ, आशियाई कबड्डी महासंघ, आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन, आशियाई ऑलिम्पिक असोसिएशन यापैकी कोणत्याही संघटनेची मान्यता ‘वर्ल्ड कबड्डी लीग’साठी घेण्यात आलेली नाही. याविषयी आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे सहाय्यक सचिव देवराज चतुर्वेदी म्हणाले की, ‘‘सर्कल कबड्डी पंजाब-हरयाणामध्ये खेळली जाते. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या आधिपत्याखालीसुद्धा सर्कल कबड्डी येते. त्यामुळे या स्पध्रेसाठी आमची मान्यता आवश्यक होती. परंतु ती न घेताच ही स्पर्धा होणार असल्यामुळे ती अनधिकृत ठरेल.’’
‘वर्ल्ड कबड्डी लीग’च्या उत्तेजक द्रव्य चाचणीसाठी ‘वाडा’कडे विनंती पत्र संयोजकांनी पाठवले होते. मात्र आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे संचालक विनोद कुमार तिवारी यांनी स्पष्ट केले की, ‘‘वर्ल्ड कबड्डी लीगला मान्यता देण्यात आली नसून, ती खासगी स्वरूपाची आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेची फक्त आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ आणि आशियाई कबड्डी महासंघाला मान्यता आहे.’’
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि त्यांचे पुत्र उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल सर्कल कबड्डीची धुरा सांभाळत आहेत. १९७८ पासून कार्यरत असलेल्या भारतीय हौशी सर्कल कबड्डी महासंघ नामक संघटनेची सूत्रेसुद्धा त्यांच्याचकडे आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील सामने, सर्कल कबड्डीचा विश्वचषक अशा अनेक स्पर्धासुद्धा त्यांनी घेतल्या आहेत; परंतु भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मुख्य स्रोतापासून वेगळे राहून स्वतंत्र चूल बांधल्यामुळे मान्यतेच्या अनेक अडचणींना त्यांना वेळोवेळी सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच ‘वर्ल्ड कबड्डी लीग’ ही अनधिकृत स्पर्धा असल्याचे भारतीय हौशी कबड्डी महासंघाने स्पष्ट केले आहे.