India vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हा सामना एजबस्टनमध्ये पार पडला. याआधी भारतीय संघाला एजबस्टनमध्ये खेळताना एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे हा विजय भारतीय संघासाठी अतिशय खास ठरला आहे. भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा करताना इंग्लंडचा डाव २७१ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ३३६ धावांनी आपल्या नावावर केला. या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारतीय संघाला विजयाची संधी होती. पण हा सामना भारताला गमवावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघाला एकही गुण मिळाला नव्हता. आता दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून भारतीय संघाने १२ गुणांची कमाई केली आहे. यासह भारतीय संघाची विजयाची सरासरी ५० टक्के इतकी झाली आहे. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
तर दुसरीकडे हा सामना गमावलेला इंग्लंडचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यात १२ गुणांची कमाई केली होती. मात्र, या सामन्यात पराभव झाल्याने इंग्लंडची विजयाची सरासरी ५० टक्क्यांवर येऊन पोहोचली आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने १ सामना खेळला असून या सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी १०० टक्के इतकी आहे. तर श्रीलंकेचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेने ६६.६७ गुणांची कमाई केली आहे. तर ५० टक्के गुणांसह इंग्लंडचा संघ तिसऱ्या आणि भारतीय संघ चौथ्या स्थानी आहे. तर बांगलादेशचा संघ या यादीत पाचव्या स्थानी आहे. वेस्टइंडिजचा संघ सहाव्या स्थानी आहे. न्यूझीलंडचा संघ सातव्या स्थानी आहे. पाकिस्तानचा संघ आठव्या स्थानी आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वात शेवटी आहे.