आजपासून सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंचे ऑलिम्पिक पात्रतेचे उद्दिष्ट
नूर-सुल्तान (कझाकस्तान)
जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ होत असून, पदकासह ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय कुस्तीपटू उत्सुक आहेत. बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्याकडून भारताला प्रमुख अपेक्षा आहेत.
बजरंगने यंदाच्या हंगामात डॅन कोलोव्ह, आशियाई अजिंक्यपद, अली अलीव्ह आणि यासर डोगू अशा चार स्पर्धामध्ये सहभागी होऊन पदके मिळवली. त्यामुळेच ६५ किलो गटाच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या बजरंगला या स्पर्धेसाठी प्रथम मानांकन देण्यात आले आहे. त्याची कामगिरी सातत्यपूर्ण होत असली तरी पायाचा बचाव हे कच्चे दुवे त्याला सुधारावे लागणार आहेत.
पुरुष फ्रीस्टाइल प्रकारात भारताला आतापर्यंतचे एकमेव सुवर्णपदक सुशील कुमारने जिंकून दिले आहे. ७४ किलो गटात दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील जागतिक व्यासपीठावर पुनरागमन करीत आहे. आता नऊ वर्षांनंतर भारताला दुसरे सुवर्णपदक बजरंग जिंकून देऊ शकेल, अशी आशा आहे. २५ वर्षीय बजरंगने दोन जागतिक पदके जिंकली आहेत. परंतु सोनेरी यश तो अद्याप मिळवू शकला नाही. त्याला या वाटचालीत रशियाच्या गॅडझिमुराद रशिदोव्ह आणि बहरिनच्या हाजी मोहम्मद अली यांच्याकडून प्रमुख आव्हान असेल. महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारे ६१ किलो गटात सहभागी होत आहे.
साक्षीला यंदाच्या हंगामात वजनी गट बदलावा लागला. ५० किलोऐवजी ती ५३ किलो गटात सहभागी झाल्यामुळे स्थिरावण्यासाठी थोडा वेळ घेतला. परंतु तरीही पाच स्पर्धाच्या अंतिम फेरीपर्यंत तिने मजल मारली. यापैकी यासर डोगू, स्पेन ग्रां. प्रि. आणि पोलंड येथील स्पर्धामध्ये तिने सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली. गेल्या वर्षी कोपराला झालेल्या दुखापतीमुळे तिला बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. भारताच्या एकाही महिला खेळाडूला जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवता आलेले नाही. त्यामुळे पहिलेवहिले जागतिक सुवर्णपदक विनेशला साद घालत आहे.
रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक आंतरराष्ट्रीय स्तरावर झगडत आहे. २०१७च्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेपासून तिला कोणत्याही स्पर्धेत विजेतेपद मिळालेले नाही. यंदाच्या डॅन कोलोव्ह स्पर्धेतील उपविजेतेपद ही तिची सर्वोत्तम कामगिरी ठरेल. या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानण्यापूर्वी तिने जागतिक विजेत्या पेत्रा ऑलीला धूळ चारली.
भारतीय संघ
पुरुष फ्रीस्टाइल : रवी कुमार (५७ किलो), राहुल आवारे (६१ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो), करण (७० किलो), सुशील कुमार (७४ किलो), जितेंदर (७९ किलो), दीपक पुनिया (८६ किलो), प्रवीण (९२ किलो), मौसम खत्री (९७ किलो), सुमित मलिक (१२५ किलो).
पुरुष ग्रीको-रोमन : मनजीत (५५ किलो), मनीष (६० किलो), सागर (६३ किलो), मनीष (६७ किलो), योगेश (७२ किलो), गुरप्रीत सिंग (७७ किलो), हरप्रीत सिंग (८२ किलो), सुनील कुमार (८७ किलो), रवी (९७ किलो), नवीन (१३० किलो).
महिला फ्रीस्टाइल : सीमा (५० किलो), विनेश फोगट (५३ किलो), ललिता (५५ किलो), सरिता (५७ किलो), पूजा धांडा (५९ किलो), साक्षी मलिक (६२ किलो), नवज्योत कौर (६५ किलो), दिव्या काक्रन (६८ किलो), कोमल भगवान गोळे (७२ किलो), किरण (७६ किलो).