scorecardresearch

WPL 2023, UP-W vs DC-W: ताहिला मॅकग्राचे झुंजार अर्धशतक! दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत जाण्यासाठी १३९ धावांची गरज

महिला प्रीमिअर लीगमधील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यात होत असून दोन्ही संघ प्ले-ऑफमध्ये पोहचले आहेत.

WPL 2023, UP-W vs DC-W: Tahila McGrath's Fighting Half-Century Delhi Capitals need 139 runs to reach the final
सौजन्य- WPL २०२३ (ट्विटर)

WPL 2023 UP-W vs DC-W Updates: महिला प्रीमियर लीगचा २०वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यूपी वॉरियर्सने २० षटकांत ६ बाद १३८ धावा केल्या. दिल्लीला अंतिम फेरी गाठण्यासाठी १३९ धावा कराव्या लागतील. दोन्ही संघ याआधीच प्ले-ऑफमध्ये पोहचले आहेत. एलिमिनीटरचा सामना खेळायचा नसेल तर दिल्लीला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

यूपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर १३९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १३८ धावा केल्या. यूपीसाठी ताहिला मॅकग्राने तुफानी खेळी केली. तिने ३२ चेंडूत नाबाद ५८ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. मॅकग्राने आपल्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार मारले. त्यांच्याशिवाय अ‍ॅलिसा हिलीने ३६, श्वेता सेहरावतने १९ आणि सिमरन शेखने ११ धावा केल्या. दीप्ती शर्माने ३ तर किरण नवगिरेने केवळ २ धावांचे योगदान दिले. सोफी एक्लेस्टोन खाते न उघडताच बाद झाली. अंजली सरवानी तीन धावा करून नाबाद राहिली. दिल्ली कॅपिटल्सकडून एलिस कॅप्सीने ३ विकेट्स घेतल्या. तर राधा यादवने २ आणि जेस जोनासेनने एक विकेट घेत तिला साथ दिली.

आजच्या सामन्यात दिल्ली संघाने जरी चांगली गोलंदाजी केली असली तरी देखील गचाळ क्षेत्ररक्षणाने सगळ्यात जास्त झेल याच सामन्यात सोडले आहेत. दिल्ली संघ त्यांच्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. असेच जर फायनल किंवा सेमीफायनल सामन्यात खेळले असते तर त्यांच्यासाठी परिस्थिती खूप अवघड होऊन बसेल. दिल्ली कॅपिटल्सची नजर थेट अंतिम फेरी गाठण्यावर आहेत. त्यांच्या खात्यात सध्या १० गुण आहेत. जर त्यांनी हा सामना जिंकला तर मुंबईचे १२ गुण आणि दिल्लीचे देखील १२ गुण होतील. अशा परिस्थितीत ज्या संघाचा नेट रनरेट चांगला असेल तो थेट अंतिम फेरीत खेळेल. त्याला सेमीफायनल म्हणजेच एलिमिनीटरचा सामना खेळण्याची गरज नाही.

कर्णधार मेग लॅनिंगने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीने आजच्या सामन्यात प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केला नाही. त्याचबरोबर यूपी वॉरियर्सची कर्णधार अ‍ॅलिसा हिलीने संघात तीन बदल केले आहेत. ग्रेस हॅरिस, राजेश्वरी गायकवाड आणि देविका वैद्य यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्याजागी एस. यशश्री, शबनम इस्माईल आणि श्वेता सेहरावत यांना संधी मिळाली आहे.

हेही वाचा: IPL 2023: अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर BCCI हायअलर्टवर, मॅच फिक्सिंगच्या भीतीने खेळाडूंना सावध राहण्याचा सल्ला

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, जेमिमा रॉड्रिग्ज, मारिजन कॅप, तानिया भाटिया (विकेटकीपर), जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, पूनम यादव

यूपी वॉरियर्स: श्वेता सेहरावत, एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, सिमरन शेख, पार्श्वी चोप्रा, अंजली सरवानी, सोप्पधंडी यशश्री, शबनम इस्माईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 21:12 IST

संबंधित बातम्या