WTC Final Next three editions will be held in England: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं आता तिसरं चक्र सुरू आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं चक्र दोन वर्षांचं असत आणि यादरम्यान संघ एकमेकांविरूद्ध कसोटी मालिका खेळतात. यानंतर अखेरीस WTC गुणतालिकेती अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जातो. हा अंतिम सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने तटस्थ ठिकाणी खेळवला जातो. यादरम्यान आयसीसीने मोठा निर्णय घेत अंतिम सामन्यांचं ठिकाण पुढील ३ वर्षांसाठी निश्चित केलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेतील पुढील तीन पर्वांच्या अंतिम सामन्याचे यजमानपद इंग्लंडकडे कायम राखण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीच्या पहिल्या तीन पर्वांच्या अंतिम लढतीही इंग्लंडमध्येच झाल्या होत्या.

‘आयसीसी’च्या रविवारी येथे संपलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. ‘डब्ल्यूटीसी’चे २०२७, २०२९ आणि २०३१ सालचे अंतिम सामने इंग्लंडमधील क्रिकेटच्या हंगामात म्हणजेच जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) यापूर्वी २०२१ मध्ये साऊदम्प्टन, २०२३ मध्ये ओव्हल आणि यावर्षी लॉर्ड्स येथे अंतिम सामन्याचे आयोजन केले होते.

२०२७ मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारतात होणार असल्याची चर्चा सुरू होती, पण आता या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. “आगामी तीन अंतिम सामन्यांसाठीही इंग्लंडचीच निवड करण्यात आली आहे. ‘डब्ल्यूटीसी’ चे वेळापत्रक अशा पद्धतीने संपते की अंतिम सामन्याचा कालवाधी जून महिन्यातच येतो आणि हवामानाचा सर्वांत कमी परिणाम होणारा इंग्लंड एकमेव देश असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे ‘आयसीसी’ने म्हटले आहे.

भारतात कसोटीची लोकप्रियता कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भारतीय संघ अंतिम सामना खेळला नाही, तर अन्य संघांच्या अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांची संख्या कमी होण्याच्या भीती आहे. त्यामुळेच ‘आयसीसी’ ने भारताचा विचार न केल्याचे समजते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना असल्याने भारतीय संघ जर अंतिम फेरीत पोहोचला तर त्याचा संघाला फटका बसू शकतो. यामागील कारण म्हणजे भारताचा इंग्लंडमधील रेकॉर्ड. भारताने इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यस्पर्धेचे २ अंतिम सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. याशिवाय सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतही भारताची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. त्यामुळे टीम इंडिया पुन्हा जर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यास पुन्हा एकदा जेतेपदासाठी लांब राहणार का, अशी शंका चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.