ICC Men Player of the Month Nominations: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडणारा टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्या कामगिरीची आयसीसीने दखल घेतली आहे. त्याला ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी मानांकन मिळाले आहे.

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या कसोटी मालिकेतील चार सामने झाले असून भारताने ही मालिका ३-१ अशा फरकाने आपल्या नावे केली आहे. या मालिकेतील पाचवा सामना ७ मार्चपासून धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. पण तत्त्पूर्वी आयसीसीने या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या यशस्वीच्या कामगिरीची दखल घेतली आहे.

ICC ने फेब्रुवारी २०२४ च्या प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी तीन खेळाडूंना मानांकन दिले आहे. या यादीत भारताचा जबरदस्त फॉर्मात असलेला सलामीवीर यशस्वी जैस्वाल, न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन आणि श्रीलंकेचा सलामीवीर पाथुम निसांका यांच्या नावांचा समावेश आहे. जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून प्रथमच त्याला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

इंग्लंडविरूध्दच्या हैदराबाद कसोटीत २८ धावांनी पराभव पत्करावा लागल्याने भारताची सुरुवात खराब झाली होती. मात्र जैस्वालच्या उत्कृष्ट फॉर्मसह भारताने पुनरागमन केले. यशस्वीने विशाखापट्टणम आणि राजकोट येथे सलग दुहेरी शतके झळकावली. त्याने एका कसोटी डावात सर्वाधिक १२ षटकार मारण्याच्या विक्रमाचीही बरोबरी केली. २२ वर्षीय जैस्वालने फेब्रुवारीच्या अखेरीस ११२ च्या सरासरीने एकूण ५६० धावा केल्या. २२ वर्षे आणि २९ दिवस इतक्या लहान वयात सलग दुहेरी शतके झळकावल्याने सर डोनाल्ड ब्रॅडमन आणि विनोद कांबळी यांच्यानंतर कसोटीत दोन द्विशतके झळकावणारा तो जगातील तिसरा सर्वात तरुण फलंदाज बनला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जैस्वाल आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीतही अव्वल स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे, विल्यमसनला मार्च २०२३ नंतर प्रथमच पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात मोठी भूमिका बजावली. पहिल्या कसोटीत त्याने दोन्ही डावात शतके झळकावली आणि नंतर हॅमिल्टन कसोटीत नाबाद १३३ धावांची खेळी करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. फेब्रुवारीमध्ये विल्यमसनने दोन कसोटी सामन्यांमध्ये शानदार ४०३ धावा केल्या. त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला. दरम्यान, निसांकाने श्रीलंकेच्या अलीकडच्या तीन एकदिवसीय आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली.