Yashasvi Jaiswal Wants To Play For Mumbai In Domestic Cricket: भारतीय संघातील युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने गेल्या एक वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. कमी कालावधीत त्याने आपला चांगलाच ठसा उमटवला आहे. जे भल्याभल्या फलंदाजांना नाही जमलं, ते यशस्वीने एका वर्षात करून दाखवलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मुंबईकडून खेळायचा. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने मुंबईची साथ सोडून गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्याने यू टर्न घेतला असून पुन्हा एकदा मुंबईकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी यशस्वी जैस्वालने मुंबई क्रिकेट असोसिएशनला गोवाकडून खेळण्यासाठी एनओसीची मागणी केली होती. मात्र आता यशस्वीने आपला निर्णय बदलला आहे. आता त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला ई-मेल केला असून एनओसी मागे घेण्याची विनंती केली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, यशस्वी जैस्वालला गोवा संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार होती. यासह त्याने वैयक्तिक कारणामुळे गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र आता त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला विनंती करणारा ई-मेल केला आहे. त्याने पुन्हा एकदा मुंबई संघाकडून खेळू देण्याची विनंती केली आहे. मी अजून बीसीसीआय आणि गोवा क्रिकेट असोसिएशनला एनओसी दिली नसल्याचंही या ई-मेलमध्ये म्हटलं गेलं आहे.
मुंबईसाठी खेळताना दमदार कामगिरी
यशस्वी जैस्वालने देशांर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी पाहिली, तर त्याने ३२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ६६ डावांत फलंदाजी करताना ३७१२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १२ शतकं आणि १२ अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान २०३ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
तर लिस्ट ए क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ११६ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३२.८६ च्या सरासरीने ३४५१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतकं आणि २२ अर्धशतकं झळकावली आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशस्वी जयस्वालच्या फलंदाजीचा दबदबा पाहायला मिळाला आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेतील कामगिरी
यशस्वी जैस्वालने आयपीएल २०२५ स्पर्धेतही आपली छाप सोडली आहे. त्याची या हंगामातील कामगिरी पाहिली, तर त्याने सलामीला फलंदाजी करताना १२ सामन्यांमध्ये ४७३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ अर्धशतकं झळकावली आहेत. मात्र, राजस्थान रॉयल्सचा संघ या स्पर्धेत आपली छाप सोडू शकलेला नाही. संजू सॅमसनसची दुखापत राजस्थानला चांगलीच महागात पडली. राजस्थानचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.