Yashasvi Jaiswal Reveal Rohit Sharma Message before century: यशस्वी जैस्वालने त्याच्या इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेची सांगता शतकाने केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्यात यशस्वीने शानदार शतक झळकावत टीम इंडियाने उभारलेल्या मोठ्या धावसंख्येत मोठी भूमिका बजावली. तिसऱ्या दिवशी, माजी कर्णधार रोहित शर्मा देखील टीम इंडियाच्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता आणि यशस्वीने त्याच्यासमोर एक शानदार खेळी केली. त्यानंतर त्याने फलंदाजी करताना रोहितने त्याला काय संदेश दिला होता, ते तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सांगितलं.
ओव्हल कसोटीत, भारतीय संघाचा फलंदाज यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी करत ११८ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान, त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. त्याच्या खेळीदरम्यान त्याने १४ चौकार आणि दोन षटकार मारले.
त्यामुळे यशस्वी जैस्वालने तिसऱ्या दिवशी धमाकेदार खेळी करत इंग्लंड दौऱ्याचा शेवट शतकाने केला. जैस्वालने लीड्स येथील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावले होते. त्यानंतर, त्याने शेवटच्या कसोटीच्या शेवटच्या डावातही शतक झळकावले. त्याच्याशिवाय आकाश दीप (६६), रवींद्र जडेजा (५३) आणि वॉशिंग्टन सुंदर (५३) यांनीही अर्धशतकं झळकावली. यासह भारताने दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या आणि इंग्लंडला ३७४ धावांचे लक्ष्य दिले.
रोहित शर्माने यशस्वी जैस्वालला शतकापूर्वी काय मेसेज दिला होता?
स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये यशस्वी जैस्वाल म्हणत आहेत की, “खेळपट्टी फलंदाजीसाठी थोडी अवघड होती, कारण चेंडूची खूप हालचाल होत होती. मी रोहितला स्टँडमध्ये पाहिलं आणि तो मला म्हणाला, मैदानावर टिकून खेळत राहा.”
जर टीम इंडियाला मालिका बरोबरीत आणायची असेल तर पाचवी कसोटी जिंकणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने एक विकेट गमावून ५० धावा केल्या आहेत आणि त्यांना आणखी ३२४ धावांची आवश्यकता आहे.
रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कसोटीमधून अचानक निवृत्ती जाहीर केली, ज्यामुळे त्याच्या जागी शुबमन गिलला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. रोहित शर्माच नाही तर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटलं या मालिकेच्या सुरुवातीपूर्वी त्याने हा निर्णय घेतला. कसोटी निवृत्तीनंतर रोहित शर्मा कसोटी सामना पाहण्यासाठी ओव्हलच्या मैदानावर पोहोचला होता.