कर्करोगावर मात केल्यानंतर युवराज सिंगने अहमदाबादमध्ये आपले झोकात कसोटी पुनरागमन साजरे केले. आता त्याने कसोटी क्रिकेटमधील आपले स्थान पक्के करण्याकडे लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना भारताचे माजी कर्णधार कपिल देवने केली.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि स्तंभलेखक मकरंद वायंगणकर लिखित ‘युवी’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी अनेक मान्यवर क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत खार जिमखाना येथे झाले. त्यावेळी कपिल म्हणाला की, ‘‘एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०च्या प्रांतात युवराजप्रमाणे फटके खेळणारा दुसरा क्रिकेटपटू जगात नाही. पण कसोटी क्रिकेटमध्येही युवराजने स्वत:ला सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. त्याने कसोटी क्रिकेटकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. कसोटी क्रिकेटसुद्धा युवराज चांगल्या पद्धतीने खेळेल. कारण क्रिकेट हाच त्याचा ध्यास आहे.’’
कपिल पुढे म्हणाला की, ‘‘जेव्हा मी निवड समितीचा अध्यक्ष झालो तेव्हा युवराज कसोटी मालिका खेळेल याची मी काळजी घ्यायचो. बंगळुरूमध्ये पाकिस्तानविरुद्ध युवी चांगला खेळला आणि १६९ धावांची दमदार खेळी साकारली. कसोटी क्रिकेटमध्ये मी पाहिलेली एक अप्रतिम खेळी म्हणून युवीच्या त्या शतकाचे मी वर्णन करेन.’’
‘‘पण दुर्दैवाने सराव सत्रात युवीला दुखापत झाली आणि त्यामुळे पुढील वर्षभर तो खेळू शकला नाही. त्या दुखापतीमुळे युवीचे नुकसान झाले. युवीचा खेळ पाहताना वेस्ट इंडिजचे महान फलंदाज गॅरी सोबर्स यांची आठवण होते,’’ असे कपिलने सांगितले.
माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर म्हणाले की, ‘‘युवराजकडे असामान्य गुणवत्ता आहे. तो शिस्तबद्ध क्रिकेटपटू आहे. इतक्या वर्षांमध्ये युवराज फार कसोटी सामने खेळू शकला नाही. याचे मला आश्चर्य वाटते.’’
वायंगणकर यांचे १९७९पासून युवराजच्या कुटुंबीयांशी घनिष्ठ संबंध आहेत. वायंगणकर यावेळी म्हणाले की, ‘‘युवराज जेव्हा अमेरिकेहून उपचार घेऊन आला. तेव्हा मी त्याला सांगितले की मैदानावर कामगिरी दाखव. सहानुभूतीची अपेक्षा करू नकोस. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सीसीआयच्या सराव सामन्यात मी त्याला पाहिले. युवराजच्या दृष्टीकोनात कमालीचा बदल झाला आहे. हा युवक आता परिपक्व झाला आहे.’’
युवराजचे वडील माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांच्या भावनिक भाषणाने सारे सभागृह सद्गदीत झाले. ते म्हणाले की, ‘‘माझा मुलगा कर्करोगाशी झुंज देत होता तेव्हा तमाम देशवासियांनी तो बरा व्हावा, यासाठी देवाकडे प्रार्थना केली होती. त्या सर्वाचा मी ऋणी आहे. युवराज म्हणजे देवाकडून मिळालेले वरदान आहे. असा पुत्र प्रत्येक घरात जन्मायला हवा.’’
‘‘युवराज ही माझ्या हृदयाची कहाणी आहे. माझ्या जखमांतूनच तो साकारला आहे. मीही एक पुस्तक लिहिणार आहे. ते कथानक सध्या अधुरे आहे. ते पूर्ण करायचे आहे,’’ असे योगराज यावेळी म्हणाले.  
ते पुढे म्हणाले, ‘‘युवराजला कर्करोग झाला तेव्हा इंग्लंडहून त्याने मला दूरध्वनी करून आपल्याला बरे वाटत नसल्याचे सांगितले.
तेव्हा कथा अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे तू मरणार नाहीस. तुलाच ती पूर्ण करायची आहे, असे बजावले.’’    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

..और दो लोग प्लॅटफॉर्मपर गिरे!
दिलीप वेंगसरकर यांनी सांगितलेल्या किश्शाला क्रिकेटरसिकांनी भरभरून दाद दिली. युवी १५ वर्षांचा असताना ओव्हलवर सरावासाठी यायचा. पहिल्या दिवशी दुपारी ३चे सराव सत्र होते. पण संध्याकाळी ५ वाजता तो पोहोचला. लोकल नीटपणे पकडू न शकल्यामुळे मी घरी परत जातो, असे युवराजने रडगाणे सुरू केले. मग योगराज सिंग यांनी युवीला स्पर्धात्मक क्रिकेट शिकण्यासाठी तुला मुंबईतच राहावे लागेल, असा दम भरला. तेव्हा किट बॅगसहित लोकल ट्रेनने अंधेरीवरून येण्याबाबतची अडचण युवीने वेंगसरकर यांना सांगितली.  त्यांनी रमेश पोवारला युवीला लोकलमध्ये चढण्याचे तंत्र शिकवायला सांगितले. पोवार युवीला म्हणाला की, किट बॅग लेने का और जैसेही ट्रेन आयेगी सबको ढकेलनेका और अंदर घुसने का. युवीने ढकेलनेका म्हणजे काय हे विचारले. तेव्हा पोवारने त्याला ‘पुश’ करायचे असे समजावले. फिर अंदर जाके कोपचे में खडा रहनेका. युवीने पुन्हा कोपचे में म्हणजे काय हे विचारले. पोवारने त्याला व्यवस्थित बाजूला उभे राहायचे, असे सांगितले.  दुसऱ्या दिवशी युवीला वेंगसरकर यांनी प्रवास कसा झाला असे विचारले. तेव्हा युवी म्हणाला, ‘‘अच्छा.. सिर्फ एक समस्या हुई. जैसेही लोकल आयी मै किट बॅग लेके अंदर घुसा लेकीन सामने से दो लोग प्लॅटफॉर्मपर गिरे.’’ ही आठवण वेंगसरकर यांनी सांगितली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youraj should concentrate on to fix position in test kapil dev
First published on: 21-11-2012 at 03:45 IST