बांगलादेशच्या तीन खेळाडूंनाही फटका
भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज आकाश सिंग आणि फिरकीपटू रवी बिश्नोई यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) निलंबन गुण जमा केले आहेत. युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने विजय मिळवल्यानंतर उभय संघांतील खेळाडूंमध्ये चकमक झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे बांगलादेशच्या तीन खेळाडूंवरही ‘आयसीसी’ने गैरवर्तनप्रकरणी निलंबनाचे गुण लादले आहेत.
बांगलादेशच्या मोहम्मद हृदोय, शमिम हुसैन आणि रकिबूल हसन या तीन खेळाडूंनी जल्लोषाच्या भरात मैदानावरच भारतीय खेळाडूंशी हुज्जत घातली. भारताच्या बिश्नोई आणि आकाश यांनीही रागाच्या भरात बांगलादेशच्या खेळाडूंवर शाब्दिक भडिमार केला. त्यामुळे ‘आयसीसी’ने नियमांचा भंग केल्याप्रकरणी कलम क्रमांक २.२१ च्या अनुसार आकाशला ८, तर बिश्नोईला ५ निलंबन गुणांची शिक्षा ठोठावली आहे. बांगलादेशच्या हृदोयच्या १०, हुसैनच्या आठ आणि रकिबुलच्या खात्यावर चार निलंबन गुण जमा झाले आहेत.
प्रत्येकी एका निलंबन गुणासाठी खेळाडूला सर्वप्रथम येणाऱ्या एखाद्या ट्वेन्टी-२०, एकदिवसीय किंवा कसोटी सामन्याला मुकावे लागते. दरम्यान पाचही खेळाडूंनी त्यांच्यावरील आरोप मान्य केले असून भविष्यात अशी चूक पुन्हा न करण्याचे आश्वासनही ‘आयसीसी’ला दिले आहे.