पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने भारताच्या युकी भांब्रीने दमदार आगेकूच केली आहे. चीनमधील ल्युहोयू टेनिस क्लबतर्फे आयोजित स्पर्धेत युकीने एकेरी प्रकारात उपांत्य फेरीत तर दुहेरी प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली. एकेरीच्या लढतीत युकीने बिगरमानांकित चीनच्या झिचेंग झुचा ६-२, ६-१ असा धुव्वा उडवला. जागतिक क्रमवारीत २०४व्या स्थानी असलेल्या युकीने पहिल्या सेटमध्ये झिचेंगची सव्‍‌र्हिस दोन वेळा भेदली. दुसऱ्या सेटमध्ये युकीची सव्‍‌र्हिस भेदण्यात झिचेंगने यश मिळवले, परंतु युकीने आपल्या सव्‍‌र्हिसवर झिचेंगला एकही गुण मिळू दिला नाही आणि दिमाखात विजय मिळवला. आता युकीचा मुकाबला तिसऱ्या मानांकित डि वू याच्याशी होणार आहे. एकेरीच्या लढतीनंतर युकीने न्यूझीलंडच्या मायकेल व्हीनसच्या साथीने खेळताना अंतिम फेरीत आगेकूच केली. द्वितीय मानांकित जोडीने तृतीय मानांकित चिह फू वांग आणि जिमी वांग जोडीवर ६-२, ६-० असा दणदणीत विजय मिळवला. अंतिम फेरीत जेतेपदासाठी त्यांचा चौथ्या मानांकित माओ झिन गाँग आणि झे लि जोडीशी मुकाबला होणार आहे.