भारतीय क्रिकेट संघाचा महान माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लवकरच मैदानात उतरणार असल्याचा सूतोवाच दिला आहे, मात्र तो कोणत्या टूर्नामेंटसाठी मैदानात उतरणार आहे. याचा खुलासा त्याने अद्याप केलेला नाही. युवराजच्या चाहत्यांची संख्या करोडोंमध्ये आहे. त्याला बॅटसह मैदानात पाहणे क्रिकेटप्रेमींना खूप आनंददायी वाटेल. लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून युवराजला तो पुन्हा मैदानात कधी उतरणार हे विचारत राहतात. त्यामुळे चाहत्यांचे हे प्रेम पाहून त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

महान माजी अष्टपैलू खेळाडू युवराजने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून इंग्लंडविरुद्ध खेळलेला सामना शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “देव तुमचे ध्येयापर्यंचा रस्ता ठकवत असतो. चाहत्यांच्या विनंतीवरून मी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मैदानात उतरत आहे. तुमच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुमचे प्रेम नेहमी असेच ठेवा आणि हेच खऱ्या चाहत्याचे लक्षण आहे.”

युवराज सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला व्हिडिओ २०१७ साली इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या धुवांधार खेळीचा आहे. कटकमध्ये झालेल्या त्या सामन्यात युवीने १५० धावांची खेळी केली होती. त्याच्याशिवाय एमएस धोनीनेही १३४ धावांचे योगदान दिले.

या घोषणेनंतर युवराज सोशल मीडियावर ‘ट्रेंडिंग’ होत आहे. टी -२० विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अनेक चाहते त्याला आणि महेंद्रसिंग धोनीला पुन्हा राष्ट्रीय संघात समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत.

युवराज सिंगने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्तीनंतर तो ग्लोबल कॅनडा टी-२० लीग आणि रोड सेफ्टी मालिकेत खेळताना दिसतो. युवराजने देशासाठी साडेअकरा हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १९०० धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८७०१ आणि टी -२० क्रिकेटमध्ये ११७७ धावा केल्या आहेत. गोलंदाजी करताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये नऊ, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १११ आणि टी -२० क्रिकेटमध्ये २८ विकेट्स घेतल्या आहेत.